Breaking News

बेकायदेशीर रासायनिक साठा महाड एमआयडीसीत जप्त

महाड : प्रतिनिधी : महाड एमआयडीसीमधील श्री हरी केमिकल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाने भरलेले सुमारे एक हजारपेक्षा अधिक ड्रमचा साठा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाताच त्वरित कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली असल्याचे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी सांगितले.

महाड एमआयडीसीमध्ये बहुतांशी कारखाने रसायन उत्पादन करणारे असल्यामुळे या परिसरांमध्ये कारखाना परिसरात केमिकलचे ड्रम अथवा टाक्या असल्याचे दिसून येतात, परंतु श्री हरी केमिकल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या प्लॉट क्रमांक ए 11, ए 10 यामध्ये व त्या परिसरांत रसायन भरलेले ड्रम मोठ्या प्रमाणामध्ये ठेवण्यात आले असून कोणत्याही स्वरूपाची सुरक्षितता नसल्याची तक्रार महाड येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये करण्यात आली. या तक्रारीची दखल त्वरित घेण्यात आल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी औटी यांनी घटनास्थळाला भेट दिली. मोकळ्या जागेमध्ये ठेवण्यात आलेल्या ड्रमची तपासणी केली असता त्यामध्ये स्पेट सॉलवंट, मिक्स सॉलवंट त्याचबरोबर डांबर व अन्य घातक रसायन असल्याचे आढळून आले. सदरचे ड्रम विनापरवाना ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपाची सुरक्षितता नसल्याचे आढळून आले. सुमारे एक हजारपेक्षा अधिक ड्रम असल्याची माहिती औटी यांनी दिली. अधिक चौकशी केली असता सदरचे ड्रम अशोक कुमार एन. ठाकूर या इसमाचे असल्याचे समजले. प्रदूषण मंडळाचे अधिकारी औटी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून याप्रकरणी अशोक कुमार एन. ठाकूर याच्यावर भादंवी 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहा पोलीस निरिक्षक ए. ए. पाटील, एस. एन. घरत करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply