पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करण्याची रोह्यातील पालकांची मागणी
रोहे ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्यातील पाच शाळा या धोकादयक बनल्या आहेत. पावसाळा सुरु होण्याआधी या शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237 शाळा असून या शाळांमधून 2017-2018 या शैक्षणीक 3317 मुले व 3416 मुली असे एकुण 6733 विद्यार्थी शिकत होते. तालुक्यातील 237 पैकी सुमारे 30 शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यातील पाच शाळा धोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्या आधी किमान 20 शाळांची दुरूस्त करणे आवश्यक आहे. मोडकळीस आलेल्या 30 पैकी काही शाळांचे छप्पर तुटले आहे तर काहीच्या भिंतींना तडे गेले आहेत. या शाळांची दुरूस्ती येत्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होण्याआधी करणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील नडवली, कोलाड आदीवाशी वाडी, अमडोशी, चिंचवली तर्फे आतोणे, आणि तळाघर येथील प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी चिंचवली तर्फे आतोणे येथील शाळा तर समाज मंदिरात भरत आहे.
रोहे तालुक्यातील काही शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे या शाळांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
-साधुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, रोहे