कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन या भटक्या लोकांना जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल यासाठी भाजप पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आधार कार्ड जत तालुक्यात असल्याने रेशन बंद झाले आहे, असे पारधी समाजातील लोकांनी या वेळी सांगितले. लोकांच्या पोटाचा विषय असल्याने भाजप भटके व विमुक्त सेलच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे यांनी तत्काळ माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिकार्यांना तत्काळ सूचना केल्या. त्यानुसार लगेचच योजना आपल्या दारीचे विकी कागडा आणि राहुल गायकवाड या अधिकार्यांच्या सोबत पुन्हा विद्या तामखडे यांनी पालावर जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. लवकरच या समाजातील लोकांची आधारकार्ड रेशन कार्ड इथे बनवण्यात येतील. उपेक्षित वंचितांना आधार देण्याचा प्रयत्न राहील प्रश्न धसास लावण्यासाठी कटिबद्ध राहू, असे तामखडे यांनी आश्वासन दिले. या वेळी कामोठे मंडल सरचिटणीस मनीषा वणवे होत्या.