उरण : प्रतिनिधी
जेएनपीएने बुधवारी (दि. 5) मेरीटाइम पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये जेएनपीए 33वा वार्षिक पुरस्कार आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ आणि जेएनपीएच्या सर्व विभागांचे प्रमुख आणि भागधारकांच्या उपस्थितीत जेएनपीएच्या वाढीसाठी भागधारक, टर्मिनल ऑपरेटर्स आणि शिपिंग लाईन्सच्या उत्कृष्ट कार्याचा जेएनपीएने सत्कार केला.
केंद्रीय राज्यमंत्री, श्रीपाद नाईक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि जेएनपीएने देशाच्या आर्थिक विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सर्व विजेत्यांचे आपापल्या संबंधित श्रेणीत अभूतपूर्व काम केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वांच्या सामूहिक परिश्रमातूनच जेएनपीए कार्यक्षमतेने काम करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतीय सागरी क्षेत्रासाठी पूर्ण समर्पणाने ते जागतिक स्तरावर ओळखले जाणारे बंदर म्हणून विकसित झाले आहे.
जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएन पोर्ट पुरस्कार विजेत्यांची प्रशंसा केली आणि बंदराच्या विकासातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आज विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणार्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा. जेएनपीए हे देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर बनविण्यात योगदान देणार्या तुमच्या प्रयत्नांचे जेएनपीए कौतुक करते. मला आशा आहे की आमच्या सहकारी उद्योगातील भागधारकांनी केलेले कार्य केवळ सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकणार नाही तर सागरी आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील आव्हाने आणि घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण करतील.
या पुरस्कार सोहळ्यात बंदराच्या विविध भागधारकांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यात आली आहे, ज्यामुळे जेएनपीएला आपल्या विकासाचा मार्ग उंचावण्यास मदत झाली आणि भारतीय सागरी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. जेएनपीए देशाच्या आर्थिक वाढीसाठी वचनबद्ध आहे आणि एक्झिम व्यापाराला कार्यक्षम सेवा प्रदान करून जागतिक मूल्य पुरवठा साखळीचे नेतृत्व करीत आहे.