नागरिक अस्वच्छता, डास-मच्छरांनी हैराण
खोपोली : प्रतिनिधी
शहरातील उघडी व तुंबलेली गटारे, गेल्या अनेक महिन्यांपासून डास निर्मूलनसाठीची औषध फवारणी यंत्रणा बंद आहे. अस्वच्छतेमुळे संपूर्ण खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव झाला असून, त्यांच्या त्रासाने नागरिक हैराण आहेत.
खोपोलीची भूमिगत गटार योजना बासनात पडली आहे. शहरातील शंभर टक्के सांडपाणी उघड्या गटारातून सोडण्यात येते. ही गटारे ठिकठिकाणी तुंबत आहेत. त्यात साफसफाईत होत असलेली दिरंगाई व अनेक महिन्यापासून बंद पडलेली डास निर्मूलन औषध फवारणी यंत्रणेमुळे खोपोलीची मुलभूत नागरी स्वच्छता वार्यावर आहे. खोपोलीतील बहुसंख्य गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. सांडपाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने व उघड्या गटारांमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी भरुन राहिली आहे. तसेच डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास-मच्छरांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून महिन्याला सरासरी 200 ते 300 रुपये खर्च करून विविध उपाय केले जात आहेत. मात्र मूळ समस्या कायम राहत असल्याने, हे उपाय अपूर्ण पडत असून, शहर दुर्गंधी आणि डास, मच्छरांचा त्रासाने हैराण आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून धूर फवारणी होत नाही. गटारांची साफसफाई होत नाही. बहुतेक सर्व गटारे उघडी असल्याने सांडपाणी तुंबून मोठ्या प्रमाणत दुर्गंधी व डास मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-मिलिंद चव्हाण, नागरिक, खोपोली