आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलमध्ये स्थलांतर
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल टपाल कार्यालय पनवेल शहरातील शिवाजी चौकजवळील स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात येत्या आठवड्यात पूर्णपणे कार्यरत होणार आहे. पनवेल शहर पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये राहावे, यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले
पनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन 1942 पासून कार्यरत आहे. पोस्टाची इमारत दुरवस्थेत आल्याने पनवेल महानगरपालिकेने ती धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. ती कोणत्याही क्षणी पडून जीवित, तसेच आर्थिक हानी होण्याची शक्यता असल्याने घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सोबतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात गेली 10 वर्षे पोस्टाची इमारत पनवेल शहरातच अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबत मागणी केली होती. या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडे वारंवार पत्रव्यवहारही त्यांनी केला आहे. त्याचबरोबरीने 2010 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांच्याकडेही याविषयी पाठपुरावा करण्यात आला होता, परंतु पोस्ट ऑफिससाठी अन्यत्र जागा उपलब्ध नसल्याने मागील पावसाळी धोकादायक इमारतीचा विचार करून पोस्ट ऑफिस नवीन पनवेल येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले, मात्र त्यामुळे पनवेल शहरांतील नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व महिला बचत गट यांना त्रास होत असल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिकेने पोस्ट ऑफिससाठी पनवेल शहरात जागा उपलब्ध करण्याची विनंती महापालिकेच्या आयुक्तांना केली होती.
त्या अनुषंगाने तत्कालीन उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष अशोक (आबा) खेर, नगरसेवक नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी के. जी. म्हात्रे, प्रवासी संघाचे कार्यवाह श्रीकांत बापट, धरणीधर दवे यांनी जुलै 2018 मध्ये उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेऊन या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती. त्या वेळी उपायुक्त रसाळ यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवाजी चौकातील स्वर्गीय विलासराव देशमुख वाणिज्य केंद्रातील दोन गाळे पोस्ट कार्यालयासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे मान्य करून त्यासंदर्भात पोस्ट प्रशासनाला कळविणार असल्याचेही आश्वासित केले. त्याचबरोबर नगरसेविका मुग्धा लोंढे यांनींही विशेष याकामी पाठपुरावा केला होता. सप्टेंबर 2018 मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ठराव मांडला होता. तो मंजूरही झाला होता. त्या अनुषंगाने 6 मार्च 2019ला पनवेल महापालिका व पोस्ट कार्यालय यांच्यात पाच वर्षासाठी भाडे करार झाला असून येत्या आठवड्यात पनवेलमध्ये टपाल कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. त्यानुसार भाजपच्या शहराध्यक्षा नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी शुक्रवारी (दि. 18) आणि मंगळवारी (दि. 22) कै. विलासराव देशमुख कॉम्प्लेक्समधील गाळा नं. 110 व 111 येथे सुरू होणार्या पोस्ट ऑफीसची पाहणी केली.