मुंबई ः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खिल्ली उडवली.
‘लाव रे व्हिडीओ’ला ‘लाव रे फटाक्यांची माळ’ने उत्तर मिळाले, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. लोकसभेच्या या यशानंतर विधानसभेला मोठा भाऊ कोण असेल, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आमचे आम्ही ठरवू. विधानसभेच्या निकालानंतर पेढे खायला येथेच या, असे उत्तर दिले आहे.
– देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
महायुती अभेद्य आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्व निवडणुका सोबत लढवू. मोदींची विश्वासाची परंपरा महायुती महाराष्ट्रात रुजवतेय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. युतीमध्ये मोठा भाऊ कोण, या प्रश्नावर फडणवीस यांनी उद्धव माझे मोठे भाऊ आहेत, मात्र मोदी हे उद्धव यांचे मोठे भाऊ आहेत, असे उत्तर दिले.
विरोधकांनी पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करावे. विरोधी पक्षांनी कोणताही ठोस कार्यक्रम मांडला नाही. नकारात्मक प्रचारामुळे विरोधकांची ही स्थिती झाली आहे. कोणाला दोष देण्याऐवजी जनतेने मते का दिली नाही याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे, असा सल्लाही या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.