Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई आज घेणार शपथ

नागपूर ः प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. ते शुक्रवारी (दि. 24) शपथग्रहण करणार असून त्यांच्या रूपाने सर्वोच्च न्यायालयातील मराठी न्यायमूर्तींच्या यादीत आणखी एका मराठी न्यायमूर्तीचा समावेश होणार आहे.

गवई यांच्यासह हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि गोहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांचीही

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजिअमच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली. न्या. भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. केरळ व बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांचे ते पुत्र असून त्यांच्या मातोश्री कमलताई या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लहान बंधू राजेंद्र गवई हे आरपीआयचे नेते आहेत. भूषण गवई यांनी मुंबई येथील महाविद्यालयातून वकिलीची पदवी संपादन केल्यावर माजी महाधिवक्ता, माजी. न्या. बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. 1987 ते 90मध्ये मुंबईत वकिली केल्यावर नागपूर खंडपीठात वकिलीला सुरुवात केली. भारतीय राज्यघटना, प्रशासकीय कायदे आदीतील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. 14 नोव्हेंबर 2003मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर न्यायदानाचे कार्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.

सर्वोच्च न्यायालयात 31 न्यायमूर्तींची पदे मंजूर असून त्यापैकी चार पदे रिक्त आहेत. या चार पदांवर न्यायमूर्ती नेमण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रामना, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. रोहिग्टन नरीमन यांच्या कॉलेजिअमने सदर चौघांची शिफारस केली. देशभरातील सेवाज्येष्ठता यादीत गवई हे आठव्या क्रमांकावर आहेत. न्या. बोस आणि बोपन्ना यांचे प्रस्ताव केंद्राने एकदा परत पाठवले होते, पण कॉलेजिमने पुन्हा शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतींनी सदर नावांवर शिक्कामोर्तब केले.येत्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील तीन न्यायमूर्ती सरन्यायाधीश होणार आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये न्या. शरद बोबडे हे न्यायमूर्ती होतील व ते 2021पर्यंत कायम राहतील. त्यानंतर न्या. उदय लळीत, न्या. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होतील. 2025मध्ये न्या. गवई हे सरन्यायाधीश होणार असून ते सहा वर्षांत बोबडे, लळीत यांच्यानंतर तिसरे नागपूरकर सरन्यायाधीश असतील.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply