17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकर्यांना मोठी भेट दिली आहे. एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 8) हा निर्णय घेतला. यानुसार 2022-23 पीक वर्षासाठी 17 पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या वेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकर्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांना पिकाला चांगला भाव मिळतो.
ना. अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी जसे ठरवण्यात आले होते की, खर्च अधिक 50 टक्के तो निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधी अंतर्गत दोन लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. खतावर दोन लाख दहा हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.
पीक विविधतेला प्रोत्साहन
कृषी अर्थसंकल्प एक लाख 26 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. आमच्या सरकारने इतरही अनेक पिकांना एमएसपीच्या कक्षेत आणले आहे. विम्यापासून सिंचनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण झाले आहे. कृषी क्षेत्रात अनेक पावले उचलली गेली आहेत. पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने एमएसपीच्या दरात ऐतिहासिक वाढ केली, ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या निर्णयांमुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे, असेही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.