ही गोष्ट दिलीपकुमार अॅन्ग्री ओल्ड मॅन बनण्यापूर्वीची… दिलीपकुमार सूडनायक कधीपासून झाला? सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता ’पासून. त्याने तसे करणे बदलत्या काळानुसार गरजेचे होते. रमेश तलवार दिग्दर्शित ’दुनिया’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’ यातही दिलीपकुमारने सूडाची भूमिका साकारलीय. सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’, ’कर्मा’ आणि ‘सौदागर’ अशा तीन चित्रपटात दिलीपकुमार होता ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. एक प्रकारचा विक्रमच.
दिलीपकुमारची कार्यशैली आत्मसात करून सुभाष घईनी हे यश प्राप्त केले असे कौतुकाने म्हणायला हवे. साठ व सत्तरच्या दशकातील यशस्वी निर्माता व दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी जबरदस्त या चित्रपटाचे मुहूर्त दिलीपकुमारवरच केला. आशा पारेखने त्यासाठी मुहूर्त क्लॅप दिला. काही कारणास्तव हा चित्रपट मुहूर्ताकडे जात नव्हता, दिलीपकुमारऐवजी संजीवकुमारला घेऊन जबरदस्त पडद्यावर आणला आणि फर्स्ट शोपासूनच सुपर फ्लॉप.
त्या काळातील दिलीपकुमारचा अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे मुशीर रियाज निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित शक्ती. त्यात दिलीपकुमार व अमिताभ बच्चन यांच्यात अभिनयाचा जबरदस्त सामना रंगला. काही दृश्यात अमिताभ भारी ठरलाय हे सत्य त्या काळातील दिलीपकुमारप्रेमीना मान्य झाले नाही. वस्तुस्थिती तीच आहे. हे सगळेच घडण्यापूर्वीच एक महत्वाची गोष्ट घडली.
बी.आर.चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित बी.आर. फिल्मचा दास्तान (रिलीज 3 मार्च 1972) पडद्यावर येताच रसिकांनी पूर्णपणे नाकारला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी त्रेपन्न वर्षे पूर्ण झाली तरी तो विविध कारणास्तव फोकसमध्ये आहे. (हेदेखील एक प्रकारचे यशच म्हणायचे) याच दिवशी प्रदर्शित झालेल्या मेहमूद व एन.सी. सिप्पी निर्मित व एस. रामनाथन दिग्दर्शित ’बॉम्बे टू गोवा’ची एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्टची गाडी मात्र आजही सुरू आहे. एकाच शुक्रवारी हे दोन चित्रपट प्रदर्शित होताना पहिल्या दिवसापुरते ‘दास्तान
’चे पारडे जड होते. रसिकांनी ’बॉम्बे टू गोवा’च्या बाजूने कौल दिला. मी कायमच म्हणतो, कोणता चित्रपट डोक्यात नि डोक्यावर घ्यायचा याचा निर्णय प्रेक्षकांनाच घेऊ देत. त्यांची आवडीनिवडीची भूमिका खूपच महत्त्वाची. त्यांना ‘निमल’, ‘पुष्पा 2’, ‘छावा’ आवडले आणि हाऊसफुल्ल गर्दीत ते धो धो चालू लागले ही यशाची गोष्ट वर्षानुवर्ष सुरू आहे.
(आजच्या कार्पोरेट युगाला उगाच वाटतं, मोठ मोठ्या जाहिराती, मुलाखती आणि उत्पन्नाचे फुगवलेले आकडे दिल्याने पिक्चर हिटचा समज होतो. पब्लिकला गृहीत धरू नका. यह पब्लिक है, सब जानती है.
दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेला ‘दास्तान’ तर रसिकांनी पूर्णपणे नाकारला. जराही उशीर न करता नाकारला. चाणक्य दिग्दर्शित राम और ‘श्याम’ (1967)मधील दिलीपकुमारचा डबल रोल लोकप्रिय ठरल्यानंतरचा हा चित्रपट. राम और श्याम आजही जवळपास साठ वर्षांनंतर फुल्ल करमणूक करतो. कितीही वेळा पहावा. एन्जॉय करावा. धमाल अनुभव. दास्तानचे मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टी होते आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच रसिकांनी आपली निराशा व्यक्त केली. त्याना चित्रपटात काहीच दम दिसेना. बी.आर. चोप्रा यांजकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतेच. प्रेक्षकांची नाडी ओळखलेला आणि विविधता दिलेला दिग्दर्शक ही त्यांची ओळख.
बी.आर. चोप्रा यांनी आपल्याच अफसाना (1951) या सुपर हिट चित्रपटाची रिमेक म्हणून दास्तानची अतिशय जोरदार पूर्वप्रसिद्धीने निर्मिती केली. मूळ चित्रपटात अशोककुमार डबल रोलमध्ये होते. घोषणेपासूनच दास्तान चर्चेत राहिला. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित नया दौर (1957)मध्ये दिलीप कुमारने भूमिका साकारली होती आणि चित्रपट यशस्वी ठरला होता. उत्तम सामाजिक आशय असलेला असाच हा चित्रपट.
दास्तानची नायिका म्हणून शर्मिला टागोरची निवड झाली म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शर्मिला टागोर खास करुन शशी कपूर (वक्त, आमने सामने वगैरे), धर्मेंद्र (यकिन, मेरे हमदम मेरे दोस्त, देवर इत्यादी), राजेश खन्ना (आराधना, अमर प्रेम वगैरे), यांची नायिका म्हणून ओळखली जाणारी. पण त्या काळातील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच शर्मिला टागोरला दिलीपकुमारची नायिका बनण्याची महत्त्वाकांक्षा असणारच. दास्तान मुळे ती पूर्ण झाली. (आत्माराम दिग्दर्शित ’यह गुलिस्ता हमारा मुळे देव आनंदची नायिका बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण तर झाले, तोही पिक्चर फ्लॉप. अरेरे. शर्मिला टागोरची ही स्वप्ने रसिकांनी पूर्ण होऊ दिली नाहीत.ती राज कपूरची नायिका बनू शकली नाही इतकेच)
यांच्यासह बिंदू, आय. एस. जोहर, मदनपुरी, सचिन पिळगावकर (यांनी बालपणीच्या दिलीप कुमारची दुहेरी भूमिका साकारली), मनमोहन कृष्ण, गोपीकृष्ण, पद्मा खन्ना आणि प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका. छायाचित्रण धरम चोप्रा यांचे, तर संकलन प्राण मेहरा यांचे. साहिर यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असा अगदी वेगळा योग. सगळे कसं छान जुळून आले. या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आनंदजी यांना हवे होते, त्यांचे तसे प्रयत्नही होते, कारण तोपर्यंत त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या चित्रपटांचा संगीत दिले नव्हते. तर लक्ष्मीकांत प्यारेलालही या चित्रपटासाठी प्रयत्नशील होते. कारण दिलीपकुमारच्या चित्रपटाला संगीत देण्याचा हा पहिला योग आला होता. चोप्रासाहेबांनी त्यांचीच निवड केली. गाणी आजही लोकप्रिय आहेत हे विशेष. पिक्चर फ्लॉप नि गाडी हिट असा हा फंडा. अनेक चित्रपटांबाबत घडलेला. चित्रपट इतिहासातील हाही एक रंग.
चित्रपट पूर्ण होताच याच्या गाण्याच्या तबकडी विक्रीला आल्या. त्यातील ना तू जमी के लिए (पार्श्वगायक मोहम्मद रफी) हे दर्दभरे गाणे ’ऐकता ऐकता’ लोकप्रिय झाले. दिलीप कुमार आणि मोहम्मद रफी हे अगदी हिट आणि फिट समीकरण. याशिवाय मारिया ओ स्वीट हार्ट (महेन्द्र कपूर आणि आशा भोसले), ओ हाय मै की करा, वो कोई आया (आशा भोसले) इत्यादी गाण्यांचा चित्रपटात समावेश. बी.आर. चोप्रांच्या चित्रपटातील गाणी हा कायमच विशेष उल्लेखनीय गोष्ट.
एकादा दिग्दर्शन आपल्याच सुपर हिट चित्रपटाची रिमेक करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. ’अफसाना ’चे लेखन आय. एस. जोहरचे आहे (तोच तो अभिनेता जोहर) आणि त्यात अशोककुमार (दुहेरी भूमिका), वीणा, प्राण, कुलदीप कौर, जीवन इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. असद भोपाली यांच्या गीताना हुस्नलाल भगतराम यांचे संगीत आहे. या चित्रपटातील अभी तो मै जवान हू (लता मंगेशकर), किस्मत बिगडी दुनिया बदली (मुकेश) ही गाणी लोकप्रिय झाली.
हा ’अफसाना’ तमिळ चित्रपट ’वेंडट्टा ’ या चित्रपटावर बेतला होता. एखाद्या चित्रपटाची पाळेमुळे अशी रुजलेली असतात. एक सुपरहिट चित्रपट कुठून कसा भाषा बदलत, रुपडं बदलत प्रवास करतो याच्या अनेक उदाहरणातील हाही एक चित्रपट.
या चित्रपटाची थीम काय? एक असतो, सरळमार्गी, सत्प्रवृत्त न्यायाधीश अनिलकुमार दीवाण तर दुसरा असतो रंगभूमीवर काम करणारा अभिनेता सुनील ( दोन्ही भूमिकेत दिलीपकुमार). हा कलाकार श्रीमंत घरातला. पण अभिनयाचे त्याला विशेष आकर्षण आहे. एकदा एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट होते तेव्हा एक नाट्य घडते. अभिनेता ठरवतो की यापुढे आपण या न्यायाधिशासारखी दाढी लावून वावरायचे. त्यानुसार तो न्यायाधीश झोपला असताना त्याची दाढी सफाचट करतो आणि स्वतः खोटी दाढी लावतो. दुर्दैवाने या खोटी दाढी लावलेल्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू होतो आणि वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध होते, न्यायाधीशाचे अपघातात निधन… आपल्याच निधनाचे वृत्त वाचून न्यायाधीश हादरतो. आता दाढी नसलेला न्यायाधिश आपल्या घरी येतो तेव्हा त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसतो. आपल्या निधनाचे वृत्त समजताच त्याची पत्नी माला ( बिंदू) ही आपला प्रियकर राजनसोबत ( प्रेम चोप्रा) अतिशय स्वच्छंदीपणे, मोकळेपणाने, दिलखुलासपणे मौजमजा करीत असते. वृत्तपत्रात आलेल्या न्यायाधीशाच्या निधनाचे वृत्त तिचा मोठा आधार असतो, ते सत्य आहे असा तिचा समज, पण घरातील इमानी कुत्रा मात्र आपल्या मालकाला अर्थात न्यायाधीशाला ओळखतो. क्लायमॅक्सला हा न्यायाधीश आपली बदफैली पत्नी आणि तिच्या प्रियकरावर सूड उगवतो. पुरेपूर नाट्य असलेली ही गोष्ट. पण कुठेतरी फसली. रसिकांना गुंतवून ठेवू शकली नाही.
चित्रपटात नायिका मीना ( शर्मिला टागोर) हिच्या व्यक्तिरेखेला फारसं स्थान मिळाले नाही. दिलीपकुमार व ती फार अलिप्त वाटतात. तिने केवळ दिलीपकुमारसोबत संधी मिळाली म्हणून हा चित्रपट स्वीकारावा? मोह दुसरे काय? आणि त्यात आपलेच नुकसान.
चित्रपटाने अपेक्षित आकार घेतला नाही त्यामुळे त्याचा परिणामही फसला आणि अर्थातच रसिकांनी चित्रपट नाकारला. सर्व हक्क रसिकांच्या स्वाधीन. रसिकांच्या दृष्टिकोनातून चित्रपट इतिहास असा रोचक.
दिलीपकुमारने दुहेरी भूमिकेतील फरक उत्तम रितीने साकारणे आणि आपल्या उत्तम अभिनयाचा प्रत्यय देणे हे याही चित्रपटात पाह्यला मिळते. कमाल केली ती प्रेम चोप्रा आणि बिंदू यांनी. दोघांची केमिस्ट्री अगदी छान जमली. बिंदूने तर जनसामान्यांना राग यावा अशा पध्दतीने या भूमिकेत रंग भरला. अगदी खुनशी कटाक्ष असो अथवा जालीम मुद्राभिनय, बिंदूने कमाल केली आहे. बिंदूने अतिशय जालीमपणे साकारलेली व्यक्तीरेखेसाठी चोप्रासाहेबांनी अगोदर आशा पारेखच्या नावाचा विचार केला. दिलीपकुमारची नायिका होण्याचे तिचे दीर्घकालीन स्वप्न अशा पध्दतीने पूर्ण होत होते. पण एकिकडे आपण देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, मनोजकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना यांची नायिका साकारत असताना केवळ दिलीपकुमारसोबत काम करायला मिळतेय म्हणून बदफैली स्री साकारायची? आशा पारेखला हे पटण्यासारखे नव्हतेच आणि बिंदूसाठी परफेक्ट भूमिका होती. तिच्या कारकिर्दीतील ही एक सर्वोत्तम भूमिका ठरली. भूमिकेवर लिहिलेले असते ते करणार्याचे नाव. फक्त योग यायला हवा. तो आलाच. आणि बिंदूला समिक्षकांनी दाद दिली. दास्तान हिट झाला असता तर बिंदूची अदाकारी अधिकाधिक अधोरेखित पोहचली असती.
त्रेपन्न वर्षांनंतरही दास्तान ची विशेष दखल घ्यावीशी वाटते हे तर त्याचे खूपच मोठे यश आहे. आणि चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे असे दुसरे काहीही नाही हो. ते हाऊसफुल्ल गर्दीतच असेल अथवा नसेल पण त्याची अशी दखल घ्यावी लागते यातही असते अथवा असू शकते. विशेष उल्लेखनीय गोष्ट, असित सेन दिग्दर्शित बैराग (1976)मध्ये दिलीपकुमारची तिहेरी भूमिका होती आणि तोही दणक्यात आपटला. त्याचाही आवाज आजही येतोय. फ्लॉप पिक्चरच्या अशा अपयशाच्या गोष्टी सांगायलाच हव्यात. त्यात काही वेगळेपण नक्कीच आहे.
दिलीपकुमारचे भक्त दास्तानपर्यंतच्या त्याच्या प्रवासावर जास्त फिदा आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून बैराग पासूनचा दिलीपकुमार त्याच्या प्रतिष्ठेला, लौकिकास साजेसा नाही. आणि म्हणूनच ते पुन्हा पुन्हा मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’, बिमल रॉय दिग्दर्शित ‘देवदास’ व ‘मधुमती’, के. असिफ दिग्दर्शित ’मुगल-ए-आझम’, बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर’, अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘दाग’ हे चित्रपट पुन्हा पुन्हा अनेकदा पाहत असतात. या चित्रपटांनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला तरी त्यावरची रसिकांची नजर कायम आहे. रसिकांच्या पुढील पिढीत हे चित्रपट सतत पुढे जात राहिले. दास्तान मात्र तिथेच थांबला…
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper