
युध्दात सगळे माफ असते असे म्हणून काही गोष्टी कोरोनाच्या या युध्दात सोडून देऊन किंवा माफ करून चालणार नाहीत. कारण हीच ती वेळ आहे, खरे चेहरे दिसण्याची आणि दाखवण्याची. कोण ढोंगी आणि कोण खरा लढवय्या हे उघड करण्याची, आणि होण्याची. नाहीतर या युध्दातून आपण काहीच शिकलो नाही असे होईल. युध्द संपल्यावर पुनःश्च हरिओम करताना गफलत होईल. या युध्दातील खरे योध्दे समाजासमोर यायला हवेत त्यांची इच्छा नसेल तरीही त्यांचा उचित सन्मान होण्याची गरज आहे. नाहीतर या युध्दातील कोरोना वॉरिअर्सची अवस्था धरणग्रस्तांसारखी व्हायची. वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागायचा. या योध्यांचा सन्मान होणे जसे गरजेचे आहे, तसेच या युध्दात गायब असलेले, बिळात लपून बसलेल्यांचे ढोंगीपणा ही उघड होण्याची गरज आहे. अशा ढोंगी चेहर्यांचा पर्दाफाश होण्याची गरज आहे. कारण अशांपासून समाजाला नेहमीच धोका राहिला आहे, असे आमचे मत आहे. यांचे ढोंगी चेहरे उघड झाल्यावर समाज ठरवू शकेल की यापुढे कुणाची संगती करायची आणि कुणाची नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जळो तयाची संगती..
कोरोना विरोधात संपूर्ण मानव जातीचा जीवन मरणाचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात अनेक हात देवदुतांप्रमाणे मदत करीत आहे. यातील शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर यांच्यासह स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, काही समाज सेवी संस्था, स्वयंप्रेरणेने अनमीकपणे अनमोल काम करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे कौतुक याआधी मी सविस्तरपणे केले. या सोबत अशा सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सगळे रोज काम करीत आहोतच. पण या युध्दातील गायब, हरवलेल्या, लपून बसलेल्या, सोईस्करपणे पलायन केलेले चेहरे मी शोधण्याचा प्रयत्न आज इथे मी जाहीरपणे करणार आहे. पाहुया ते सापडतात का? त्यासाठी फार नाही थोडे मागे जाऊन पाहू.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वाहतूक कोंडीत गुदमरदेल्या मुंबईकरांना बाहेर काढण्यासाठी मेट्रोची कामे वेगाने सुरु केली. मेट्रोच्या कारशेडसाठी सर्व बाजूने विचार करुन आरे मधील जागा निवडावी लागली. दुर्दैवाने काही झाडे तोडावी लागणार होती पण त्यासाठी दुप्पट झाडे लावण्याचे नियोजन केले व लावली. पण तथाकथित पर्यावरण प्रेमी या मेट्रोच्या कामात सातत्याने अडचणी आणू लागले अखेर हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य केले, मेट्रो कारशेडला परवानग्या दिल्या. न्यायालयाचे निर्देश अमान्य करुन त्यांनतर ही तथाकथित पर्यावरणवादी झाडांची बाजू घेऊन आंदोलनाच्या नावावर फुगडी घालत होते. आम्ही काय निसर्ग संपवून विकास व्हावा अशा भूमिकेचे नाहीत. तरी झाडे आणि निसर्ग जगावा, मुंबई भकास होईल? मुंबई बुडेल म्हणून? जगबुडी होईल असा टाहो फोडणारे, मुंबईचा कळवला असलेले मग आज अॅम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून मुंबईत रोज माणसे मरंत आहेत. रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी रूग्णांना नातेवाइक घेऊन मुंबईभर वणवण करीत आहेत. धारावीतील पोलीस अधिकारी, वांद्रे पोलीस स्टेशनमधील जवान उपचार मिळाले नाहीत म्हणून कोरोनाला बळी पडले. मुंब्र्यातील गर्भवती महिलेचा रिक्षातच मृत्यू झाला. मुंबईत 30 मे पर्यंत 1279 जणांचा मुत्यू झाला. स्मशानभूमीत बाहेर मृतदेहांना घेऊन शव वाहिन्यांच्या रांगा लागल्या आहेत. ख्यातकीर्त लेखक रत्नाकर मतकरी, लोककलावंत छगन चौघुले… झालेल्या नुकसानीची किती आकडे, नावे आणि कशी मोजदात करावी? ज्या मुंबईत आरेचे आंदोलन झाले त्याच मुंबईत आज असे दुर्दैवी चित्र आहे. मानवी हक्कांचे म्हणाल तर बहुतांश रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराची पदोपदी पायमल्ली होते आहे असे चित्र आहे. मग कुठे आहेत ते तथाकथित रक्षणकर्ते? मानवतेचे रखवालदार? झाडांना जीव असतो हे विज्ञान तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला शिकवणारे आता माणसाला जीव असतो म्हणून महाराष्ट्रात ढिम्म सरकारी यंत्रणा, प्रशासन विरोधी चकार शब्द ही का काढत नाहीत? वा पालिका, सरकारला ही प्रश्न विचारत नाहीत. आता तर मानवतेचा लढा अधिक तेत्वाषाने लढावा अशी वेळ आहे, मग बाबांनो कुठे आहात तुम्ही? कुठल्या जंगलात लपला आहात? कि आपल्या वातानुकूलित खोलीत बसून आपले चेहरे लपवत तर नाही ना? ना ढासळलेल्या शासकीय यंत्रणेबाबत बोलत, सेवा कार्य करताना ऐकिवात नाही. मग आहात कुठे?
प्रत्येक मृत्यू हा दुर्दैवी असतो अशीच आणखी एक अशीच घटना आहे, न्यायमूर्ती लोया प्रकरण. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्या न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिले तरी ते मान्य न करता पुन्हा पुन्हा न्यायालयात जावून लढा लढणारे आज कुठे आहेत? महाराष्ट्रातील गरिब, शेतकरी, मजूर, टॅक्सी, रिक्षाचालक, कामगार, बलुतेदाराला एक ही रुपयाची मदत राज्य शासनाने दिली. केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, पंजाब आणि तेलंगणा या सगळ्या राज्यांनी आपापले पॅकेज जाहीर केले. मदत केली. महाराष्ट्रात गरिबांचे जे हाल सुरु आहेत. मग आता लोया प्रकरणी वारंवार न्यायालयात जाणारे तथाकथित मानवतेचे पुजारी, पुरगामी गरिबांना महाराष्ट्र सरकारने मदत द्यावी म्हणून न्यायालयात गेल्याचे ऐकिवात नाही. मी स्वतः याबाबत याचिका केली त्यामुळे असे पुरोगामी कोर्टात मला दिसले नाहीत. म्हणून विचारावेसे वाटले, ती पाहिलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? वारंवार कोर्टात जाणारी माणसे गेली कुठे?
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर झालेली आंदोलने आणि त्यांचे बरेच विषय आहेत. कधी शेतकर्यांच्या आडून काम बंद आंदोलन करण्यात आली. कधी पायी मोर्चे काढण्यात आले. कधी आझाद मैदान, कधी मंत्रालयात, कधी पुण्यात तर कधी नागपूर आणि गडचिरोलीत…महाराष्ट्रातील या ताज्या घटना पण अशा घटनांची एक मालिका बरोबर सहा वर्षे या देशात सुरु आहेत. नवनवीन चेहरे समोर आले. आणि या देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी धडपडत राहिले. त्यावेळी या देशातील काही जणांना याचे फार कौतुक ही वाटत होते. या सगळ्या घटनांची मालिका कधी सुरु झाली याचा शोध घेत मागे गेल्यावर असे निदर्शनास येते की, जेव्हा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आल्यावर अशा ढोंगी, तथाकथित आंदोलनाला सुरुवात झाली. या फसव्या आंदोलनांचा आणि निदर्शनांचा सीएए विरोधी आंदोलनात जामिया, शाईनबाग आणि जेएनयू असा उच्चांक गाठला आणि बटबटीत हिंसक चेहराही समोर आला.
कधी कन्नया कुमार, हार्दिक पटेल, उमर खालिद, मेहक प्रभू, शर्जिल इमाम, आयेशा घोष हे आंदोलनातील समोर दिसणारे तरुण चेहरे. पण या चेहर्यांमागे माथी भडकवणारे वेगळे? हे सगळे आता कोरोनाच्या युध्दात काय करीत आहेत? महाराष्ट्रात शासन वेळीच निर्णय घेत नाही, त्यामुळे शैक्षणिक वर्षे धोक्यात आलेय, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द झाल्या, सरासरी व गुण देणार मग एटीकेटी असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का? पुढील प्रवेशात अडचणी येतील का? आम्हाला कोरोना पदवीधर म्हणतील का? अशा नैराश्याने विद्यार्थ्यांना ग्रासलेय. दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? बारावीच्या निकालाचे काय? पुढच्या शैक्षणिक वर्षांचे काय? अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आले आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना हे स्टार विद्यार्थी आंदोलक दिसत नाहीत. प्रत्यक्ष आंदोलन सोडा पण समाजमाध्यमांवर प्रश्न मांडले, सरकारला सूचनांचे निवेदन दिले, असे काही केले, बोलले, आवाज उठवला असे कुठे ऐकण्यात आले नाही. जामिया, जेएनयू मध्येच विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थी नाहीत त्यांचे प्रश्न नाहीत? त्या मांडणार नाही? मग हे करत नाही तर मग स्टार तरुण कुणाला कसली मदत तरी करीत आहेत का? कुणाला अन्नपाणी वाटत आहेत? असेही वाचायला मिळाले नाही. मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे खर्च करुन कोरोनामुळे अडचणीत आलेल्यांना मदत करणार्या गरिब बापाचे कौतुक करणार्या बातम्या आल्या. स्वयंमप्रेरणेने स्वतःच्या ट्रॅक्टरला सॅनिटायझर मशीनमध्ये बदलून गावात सॅनिटायझेशन करणार्या नाशिक, बागलानमधील जाधव या शेतकर्याचे सर्वत्र कौतुक झाले.
जसे जमेल तसे या देशातील लाखो हात एकमेकांना मदत करीत आहेत. मग हे स्टार आंदोलक सध्या काय करतात? असा प्रश्न ही पडतोच ना? आझाद काश्मीरचा फलक हातात घेऊन गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रगट होणारी तरुणाई कोरोनापासून आझाद होऊ या म्हणून देशवासियांना चिअरअप करताना दिसत नाही.
कोरोनामुळे अमेरिकेसारखा देश हादरला आहे. भारतात परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आणि जाऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार डोळ्यात तेल घालून काम करते आहे. जे अडचणीत आहेत त्या सगळ्यांना मदत करते आहे. अन्नधान्य पुरवते आहे. देशाची कोठारे सरकारने खुली केली. पण दुर्दैवाने देशातील अन्य राज्यांनी जशी मदतीची पॅकेज दिली तसे महाराष्ट्रातील सरकारने दिले नाही. अन्न, वस्त्र, निवारा, या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत महाराष्ट्रात गरिबाला या मुलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ आली पण अशावेळी हे तथाकथित मानवता वादी गेले कुठे?
त्यांचा ऐल्गार महाराष्ट्रातील शासकीय अनास्थेच्या विरोधात, कोरोना विरोधात, ढिम्म प्रशासन विरोधात, ना फेसबुकवर दिसत, ना प्रत्यक्षात दिसत, ना न्यायालयात दिसत? हे सगळे मानवतावादी, पुरोगामी एरवी मानवाच्या मुलभूत हक्कासाठी केवढा मोठा लढा लढतात. गेल्या सहा वर्षात आपल्या देशात या मानवतेच्या रक्षणकर्त्यांनी केवढा मोठा गाजावाजा केला होता. कविता, पुस्तिका, परिषदा, भाषणे केवढा डामडौल, केवढा वेळ आणि पैसा खर्च झाला, गरिबांच्या तथाकथित न्यायासाठी. मग सध्या करतात काय? महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बलुतेदार, मध्यमवर्गीय, गरिब शासनाच्या मदतीची वाट पाहते आहे. एकिकडे चिता धडधडत आहेत तर सगळ्यांना मुलभूत गोष्टींच्या अनेक चिंता सतावत आहेत. अशा वेळी हे मानवतेचे तथाकथित रखवालदार कुठे गायब झाले? याचीही चिंता जनतेला वाटून राहिली आहे.
आमचे म्हणाल तर सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला ही या सगळ्यांची जरुर चिंता वाटते..ते सध्या बरे आहेत ना? त्यांच्यासोबत गेट वे ऑफ इंडियाला आंदोलनात सहभागी झालेल्या एका महाराष्ट्रातील मंत्र्यांची ख्यालीखुशाली कळली. पण बाकिच्यांची जरा काळजी वाटली. भले आमचे ते कडवट विरोधक असले तरी आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातील आहोत. आम्ही त्यांना शत्रू वगैरे मानण्याचे कारण नाही. ढोंगीपणा करुन का होईना लोकशाहीचे काम करीत आहेत ना हे सगळे? म्हणून त्यांची तब्येत ठिकठाक आहेत ना? एवढी चौकशी मानवतेच्या दुष्टीने करावी म्हणून कोरोना काळात आठवण काढली एवढेच.
-आमदार अॅड. आशिष शेलार, माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
RamPrahar – The Panvel Daily Paper