Breaking News

आज ड्रीमलॅन्ड पंचावन्न वर्षांचे झाले असते…

आजच्या ऑनलाईन, ओटीटी, वीकेंड ट्रीप पिढीला जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह संस्कृतीबद्दल ओढ नसावी. आता तर मल्टीप्लेक्समधील फोर डी सुविधा आलिशान सीटवर बसल्या बसल्या एक वेगळाच अनुभव देते (त्यासाठी आजची युवा पिढी मल्टीप्लेक्सचे महागडे तिकीट ऑनलाईन काढण्यास तत्पर आहे) एक रसिक पिढी मात्र सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर तिकीटासाठी रांग लावून आणि पडद्यावरील डायलॉगबाजीला उत्फूर्त टाळ्या नि शिट्ट्या देत वाढली.
असेच एक एकपडदा चित्रपटगृह होते, ड्रीमलॅन्ड. आज ते असते तर ते पंचावन्न वर्षांचे झाले असते. 8 एप्रिल 1970 रोजी प्रसाद प्रॉडक्सन्स निर्मित खिलौना या चित्रपटाने ड्रीमलॅन्डचे उद्घाटन झाले. चित्रपटात संजीवकुमार, जितेंद्र, मुमताज, शत्रुघ्न सिन्हा इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. ड्रीमलॅन्डचा पहिलाच चित्रपट ज्युबिली हिट.
हेच ड्रीमलॅन्ड थिएटर अलिकडेच जमीनदोस्त झाले. आणि ते पूर्णपणे पाडल्याचे फोटोदेखील सोशल मिडियात व्हायरल झाले. ड्रीमलॅन्ड पडद्याआड गेले. मात्र माझ्यासारख्या चित्रपट रसिकांच्या मनात ड्रीमलॅन्डच्या अनेक आठवणी कायम आहेत. तो काळ आपण एकादा चित्रपट नेमक्या कोणत्या चित्रपटगृहात नि किती पैशाचे वा रुपयाचे तिकीट काढून पाहतोय यावरही लक्ष देणारा असा होता.
दक्षिण मुंबईतील गिरगाव, प्रार्थना समाज, खेतवाडी, कुंभारवाडा, ग्रॅन्ट रोड, डॉ. भडकमकर मार्ग, ताडदेव परीसरात लहानाचे मोठे झालेल्या अनेक चित्रपट रसिकांसमोर एव्हाना गिरगाव कोर्टाजवळचे हे ड्रीमलॅन्ड थिएटर डोळ्यासमोर आले असेलच. मी गिरगावात लहानपणापासून याच ड्रीमलॅन्डमध्ये अनेक चित्रपट एन्जॉय केल्याने ही वास्तू पाडली जात असल्याचे वृत्त प्रचंड निराशाजनक आणि फ्लॅशबॅकमध्ये नेणारे असेच. थिएटर जमीनदोस्त झाल्यावर त्याचे प्रोजेक्शन, पडदा, हजार बाराशे सीटस यांचे काय होते असे प्रश्न उगाच अस्वस्थ करतात. साहजिकच आहे, चित्रपटगृह म्हणजे केवळ पडद्यावरचा चित्रपट नव्हे, तर त्यासह बरेच काही असते. चित्रपट इतिहासात त्यालादेखील महत्त्व असते. कारण हेच चित्रपटगृह रसिकांपर्यंत चित्रपट पोहचवत असतो.
आयुष्यात पहिल्यांदाच एखादे चित्रपटगृह पाडल्याचा अनुभव घेतला ते होते, आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक. आमची खोताची वाडी, शेजारची आंबेवाडी आणि कुडाळेश्वर वाडी (जिला पेंडसे वाडी असे म्हटले जाते) याच्या अगदी समोरच मॅजेस्टिक सिनेमागृहाची वास्तू होती. आज त्याच्या कोणत्याही खाणाखुणा शिल्लक नाहीत. तेथे उत्तुंग इमारत उभी आहे, मात्र जगात आज कोणत्याही देशात असलेल्या मूळच्या गिरगावकरांना अशा वयाची साठी पासष्टी ओलांडल्याना मॅजेस्टीक थिएटर आजही आठवत असेल. मोहन बिल्डिंगच्या शेजारीच ते होते. पूर्वीचे आमचे गिरगाव मराठमोळे आणि मॅजेस्टीक थिएटरमध्ये सातत्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच 1972 साली ते बंद झाले आणि अख्खं गिरगाव हळहळले. माझे ते शालेय वय होते. आणि मग मुंबईतील एकेक चित्रपटगृह बंद होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळू लागल्या. बेलॉर्ड पिअरचे रेक्स (ते इंदिरा डॉकसमोरच होते). दादर टी.टी.चे ब्रॉडवे 1974ला बंद झाले… यात आणखी काही चित्रपटगृह बंदच्या बातम्या फोटोसह येत राहिल्या. कालांतराने मिनर्व्हाही बंद होऊन तेही जमीनदोस्त झाले तेव्हा फारच हळहळलो. कळत नकळतपणे आपल्या कारकिर्दीतील आणि व्यक्तिमत्त्वाचा एक भाग झालेले थिएटर डोळ्यासमोरुन जाणे हे क्लेशकारक असते. चित्रपटगृह ही फक्त एक चार भिंतीची इमारत नसते. एकीकडे चित्रपटसृष्टीच्या एकूणच चौफेर वाटचालीचा आणि समाजातील सर्वच स्तरांतील प्रेक्षकांच्या भावविश्वाचा स्वप्नांचा/आनंदाचा/आयुष्याचा/सवयीचा ते एक भाग झालेले असते. अमूकतमूक चित्रपटगृह जमिनदोस्त अशी दोन कॉलम फोटोची बातमी देण्यापुरते त्याचे अस्तित्व नसते. त्याची ’स्टोरी’ बहुरंगी असते. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरचा आपला एक इतिहास, आपली एक ओळख, आपली एक संस्कृती, आपले एक व्यक्तिमत्व असतेच असते. तुम्हीच बघा अथवा आठवा, कोणतीही दोन एकपडदा चित्रपटगृह एकसारखी नसतात. मिनर्व्हा वेगळे नि इंपिरियल वेगळे हीच तर खासियत होती.
ड्रीमलॅन्डही असेच वेगळे होते. मूळचे ते कृष्ण. त्याही पूर्वी विष्णू. त्याला दुभाष थिएटरही म्हणत. हे अगदीच जुन्या पठडीतील थिएटर होते. तेथे फार पूर्वीच प्रभात फिल्म कंपनीचा ’कुंकू’ तसेच अमृत मंथन, संत सखू, धर्मात्मा, जशास तसे, श्यामची आई असे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. याचाच अर्थ त्या काळात कृष्ण टॉकीज मराठी रसिकांना आपलेसे वाटत असेल. ड्रीमलॅन्ड सुरू होताना सुरुवातीला कृष्ण ड्रीमलॅन्ड असे जाहिरातीत म्हटले जाई. प्रेक्षकांना नवीन चित्रपटगृहाची ओळख होईपर्यंत असे म्हणणे आवश्यक वाटले गेले हे विशेष उल्लेखनीय. चित्रपटगृह संस्कृतीमधील ही गोष्टही विशेष उल्लेखनीय. एका रसिक पिढीकडून पुढील पिढीत चित्रपट जातो तसेच चित्रपटगृहदेखील जात असे. एक पिढी पुढील पिढीला आपल्या विभागातील चित्रपटगृहांच्याही आठवणी सांगते आणि ते करताना फ्लॅशबॅकमध्ये रमते.
ड्रीमलॅन्डची वैशिष्ट्ये अनेक. बाहेरच्या बाजूलाच सिनेमाची शो अथवा लॉबी कार्ड्सच्या तीन मोठ्या शो केस. येता जाता कधीही थांबून रनिंग पिक्चरची शो कार्ड्स बघायची आणि अचानक एके दिवशी ’आगामी चित्रपटाची शो कार्ड्स’ दिसत आणि या आगामी चित्रपटाचे मेन थिएटर ड्रीमलॅन्ड हे समजून येई. समांतर चित्रपट अर्थात नवप्रवाह/न्यू वेव्ह चित्रपटाचा पाया याच ड्रीमलॅन्डमध्ये घातला गेला. मृणाल सेन दिग्दर्शित ’भुवन शोम’ (1970) याच ड्रीमलॅन्डला मॅटीनी शोला रिलीज झाला आणि समिक्षकांची दाद, चोखंदळ रसिकांचा वाढता प्रतिसाद असे करत करत या चित्रपटाने पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केला आणि समांतर चित्रपट चळवळीचा आत्मविश्वास रूजला. तात्पर्य, हिंदीतील समांतर चित्रपट चळवळीत ड्रीमलॅन्ड चित्रपटगृहाचाही सहभाग आहे. चित्रपटगृह संस्कृतीतील ही विविधताच.
याच ड्रीमलॅन्डला रौप्यमहोत्सवी हिट ठरलेल्या चित्रपटांचे प्रगती पुस्तक सांगायचे तर, खिलौना, अंदाज, प्रेम नगर, गोलमाल, खट्टा मिठ्ठा, पती पत्नी और वो, सरगम, अर्जुन, बाजीगर वगैरे. लव्ह स्टोरी मेट्रोवरुन ड्रीमलॅन्डला शिफ्ट होत ज्युबिली झाला. ’तेजाब’ हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असतानाच अनिल कपूर व माधुरी दीक्षितवर आणखी एक गाणे चित्रीत करीन ते चित्रपटात समाविष्ट केले म्हणून पुन्हा ड्रीमलॅन्डची वारी केली. ’साजन’ची ज्युबिली साजरी करण्यास सुधाकर बोकाडे, लॉरेन्स डिसोझा, नदीम, श्रवण ड्रीमलॅन्डला आले आणि त्यांनी बुकिंग क्लर्क, डोअर्स किपर, वॉचमन वगैरेना ट्रॉफिज देत त्यांचा सत्कार केला. ड्रीमलॅन्डच्या माझ्या आठवणी अशा काही वेगळ्याच.
ड्रीमलॅन्डला मॅटीनी शोला अनेकदा नवीन चित्रपट प्रदर्शित होत. पिया का घर, दामाद, प्रतिबंध, तुम्हारी कसम, चला मुरारी हीरो, चटपटी बनने वगैरे ड्रीमलॅन्डला शंभर दिवसाचे यश मिळवले ते मां, जरा सी जिंदगी, पोंगा पंडित, सौ दिन सांस के, एक ही भूल, मांग भरो सजना वगैरे चित्रपटांनी.
पन्नास वर्षांत ड्रीमलॅन्डला ’वारणेचा वाघ’ हा एकमेव मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ड्रीमलॅन्डला मराठीचे वळण नव्हतेच. आणि त्यात मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षाच नव्हती.
ड्रीमलॅन्डला अनेक चित्रपट फ्लॉपही झाले. त्या काळात मेन थिएटरचा फंडा महत्वाचा असल्याने हिट अथवा फ्लॉपचा खेळ मेळ खूपच महत्त्वाचा. काही फ्लॉप सांगायलाच हवेत, जोशीला, दो ठग, प्रेम बंधन, शानदार, चरित्र, धुऐ की लकीर, किमत, पैसे की गुडिया, लफंगे, कुदरत, अलग अलग, लव्ह लव्ह लव्ह, दीवाना मुझसा नहीं, ऐतबार, डकैत वगैरे विशेष म्हणजे, ’मेरा नाम जोकर’चे मेन नॉव्हेल्टी असतानाच त्यासह ड्रीमलॅन्डला एका अर्थात पहिल्या आठवड्यासाठी तो ड्रीमलॅन्डलाही होता. प्रसाद प्रॉडक्सन्सचा ’जय विजय’ येथेच फ्लॉप झाला. ते अपयश पुसण्यासाठी काही रिशूटींग करीत ’जय विजय 2’ बनवून तोही याच ड्रीमलॅन्डला लागला तोच पडला. जणू घडवून आणलेला योगायोग.
ड्रीमलॅन्डची आणखी दोन वैशिष्ट्ये होती. प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता तेलगू, तमिळ, कन्नड अथवा मल्याळम अशा एकाद्या दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल गर्दीत चालत असे. माझे कुतूहल वाढल्याने मी शोध घेतला असता मला समजले, या पिक्चरच्या शोच्या निमित्ताने मुंबईतील अनेक साऊथ इंडियन एकमेकांना भेटत. सिनेमा पाहणे हे केवळ निमित्त असे. ही वेगळीच सामाजिक गोष्ट. साऊथ इंडियन चित्रपटाची मुंबईतील पाळेमुळे अशी खोलवर रूजलीत. आज ती पॅन इंडिया चित्रपट संस्कृतीत फारच फोफावलीत.
सत्तरच्या दशकात आम्ही चित्रपट व्यसनी प्रत्येक शुक्रवारी ड्रीमलॅन्डकडे पाठ करुन उभे राहून समोरच दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समधील बदलत्या (एखाद्या स्थिरावलेल्या) मॅटीनी शोचे तपशील मिळत. अहो, स्ट्रीट पोस्टरचे बोर्ड असत आणि या रविवारी कोणता पिक्चर मॅटीनीला एन्जॉय करायचा हे ठरवायचोच. एकदा का पिक्चर पाह्यचे ठरवले की ते एकच लक्ष्य असे. रस्त्यावरील सिनेमा पोस्टर संस्कृतीमधील हा अगदीच वेगळा फंडा. अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्या देशात चित्रपट संस्कृती रुजलीय. अशा अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्यात का?
याच ड्रीमलॅन्डच्या गल्लीत पुढे गेल्यावर पाववाला स्टीटवर बर्‍हाणपूर यांचे चित्रपटाच्या गाण्याचे छोटेसे पुस्तक विक्रीचे दुकान होते. फार पूर्वी मला आठवतय पाच पैसे किंमत होती त्याची. आणि अनेक थिएटरबाहेर असे पुस्तक उभ्या उभ्याच विकले जाई आणि डोक्यात अगदीच ताजा चित्रपट असल्याने आपोआपच खिशात हात जाई. चित्रपट गीत संगीत संस्कृतीत या साध्या कागदावर प्रसिद्ध व्हायच्या पुस्तिकांचाही वाटा.
चित्रपटगृह फक्त पिक्चरच दाखवत नसते तर त्यासह अनेक लहान मोठ्या गोष्टी घडत असतात. त्यातील अनेक गोष्टींतून आपलेही आयुष्य घडत असते, त्या गोष्टी आठवणीचा एक भाग ठरतात
आणि एके दिवशी समजते ते चित्रपटगृह जमिनदोस्त झाले. आठवणींचा पट डोळ्यासमोर येतोच पण त्यात काही अश्रूही असतात. आपल्या देशात चित्रपट ही भावनिक ओढ असते आणि त्याची बांधिलकी चित्रपटगृहाच्या आठवणीत असते. अगणित पब्लिकला आपण पिक्चर नेमका कुठे पाह्यला (थिएटर की टीव्हीवर, अथवा गल्लीत की व्हिडिओवर) हेही आठवणीत असते. आणि हे त्यांचे जगावेगळे वैशिष्ट्य आहे.
आज ड्रीमलॅन्ड असते तर ते पंचावन्न वर्षांचे झाले असते. त्याजागी उभे राहत असलेल्या उत्तुंग इमारतीत कमी सीटसचे चित्रपटगृह असेल अशी अपेक्षा. मात्र आजही ड्रीमलॅन्ड जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे. जुन्या काळातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सचे तेच तर खास वैशिष्ट्य.
दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply