Breaking News

अश्विनची कमाल, इंग्लंड बेहाल!; दुसर्या दिवसाखेर भारताकडे 249 धावांची आघाडी

चेन्नई : वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाखेर भारताने दुसर्‍या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या 134 धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला 195 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्‍या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (14) लवकर बाद झाला, परंतु रोहित शर्मा (25*) आणि चेतेश्वर पुजारा (7*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला 249 धावांची आघाडी मिळवून दिली. भारताने दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (16) आणि डॅन लॉरेन्स (9) दोघांना अश्विनने बाद केले. आपली पहिली कसोटी खेळणार्‍या अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (6) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (18) आणि ओली पोप (22) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली (6), ओली स्टोन (1), जॅक लीच (5) आणि स्टुअर्ट ब्रॉड (0) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद 42 धावांची झुंजार खेळी केली. अश्विनने पाच, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन, तर मोहम्मद सिराजने एक बळी टिपला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply