सत्तरच्या दशकात मी शाळेत असतानाचा विनोद ( आता त्यावर हसता येणार नाही. वेगळ्या अर्थाने हसाल ),
गणिताचे शिक्षक प्रश्न विचारतात , रेषा आणि बिंदू यात फरक काय?
एक हुशार विद्यार्थी पटकन उत्तर देतो, एक नायिका तर दुसरी खलनायिका ( रेषाऐवजी रेखा असं घ्यायचं).
सत्तरच्या दशकातील अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपटात बिंदूने कपटी, कारस्थानी, खुनशी, अशाच भूमिका अनेकदा डोळे वटारुन साकारल्या. त्या इतक्या आणि अशा जहाल असत की, राज खोसला निर्मित आणि दिग्दर्शित दो रास्ते (१९६९) या चित्रपटाची नायिका मुमताज बिंदीया चमकेगी वगैरे गाण्यात ठुमके लावण्यात, ठसकेबाज नृत्यात लक्ष वेधून घेत होती तरी नीला या अतिशय महत्वाकांक्षी, धूर्त , बेपर्वा, चाणाक्ष व्यक्तीरेखेत बिंदूच जास्त भाव खाऊन गेली. प्रेम चोप्राची भांडकुदळ पत्नीची ही भूमिका गाजली. आणि मग प्रेम चोप्रासोबत अनेक चित्रपटांत चांगल्या गोष्टीत विष पेरण्याचे, विघ्न घालण्याचे चांगले काम तिने रंगवून खूलवून केले. विशेषतः तिची जालीम नजर, चेहऱ्यावरचे कपटी कारस्थानी भाव आणि बोलण्याची विशिष्ट शैली यातून अनेकदा तरी ती भाव खाऊन जाई. या व्यक्तीरेखाना त्या काळात निगेटिव्ह भूमिका म्हणत. आपण कधी दिलीपकुमारसोबत काम करु असे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तरीही तिला तो योग आला आणि तिने आपल्याला कसंही करुन दिलीपकुमारसोबत काम करायला मिळू देत असं वाटत असलेल्या शर्मिला टागोरवर तिने सहज मात केली. तो चित्रपट होता,
बी. आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित दास्तान “(१९७२) . या चित्रपटातील दुहेरी भूमिकेतील दिलीपकुमारपैकी एकाची बदफैली आणि आपल्या मित्रासोबत ( प्रेम चोप्रा) रंगलिया उडवणारी पत्नी तिने एकदम कडक साकारली. हा अभिनय वाटू नये असा हा जबरा परफॉर्म्स होता. ही व्यक्तीरेखा केवळ आणि केवळ बिंदूच साकारु शकते असे म्हणावे लागले. हा चित्रपट समीक्षक आणि रसिक अशा दोघांनीही नाकारला, पण बिंदू लक्षात राहिली. मुझ जैसी औरत इस दुनिया मे न हो तो अच्छा हो हा बिंदूचा संवाद गाजला.
अशी बिंदू १७ एप्रिल रोजी चक्क पंचाऐशी वर्षांची झाली. तिचा जन्म १७ एप्रिल १९४१चा. गुजरातमधील बलसाडजवळील एका गावात गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला. वडिल नानकभाऊ देसाई हे चित्रपट निर्माते आणि आई ज्योत्स्ना नृत्य कलाकार. बिंदू सर्वात मोठी, तिला पाच बहिणी आणि एक भाऊ. पण लहानपणी चित्रपट पाह्यची परवानगी नव्हती. बिंदू घरी रेडिओवर गाणे ऐकून नृत्य करत असे. ती भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्य शिकली आणि हे कुटुंब मुंबईत राह्यला आले. नृत्य शिक्षणाने आपण चित्रपटांतून भूमिका साकाराव्यात असं तिला वाटतं होतं. अरुणा इराणी तिची मावस बहिण.
अशातच बिंदूच्या वयाच्या तेराव्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांची इच्छा मात्र तिने डॉक्टर व्हावं अशी होती.
बिंदूला वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९५९ साली संतान या चित्रपटात नायिका कामिनी कदम हिच्या लहान बहिणीची भूमिका मिळाली. या चित्रपटात राजेंद्रकुमार नायक आहे. पाठोपाठ एक फुल चार काँटे या चित्रपटात अगदीच किरकोळ भूमिका मिळाली. मोहनकुमार दिग्दर्शित अनपढ (१९६२) मध्ये रुपेरी पडद्यावर जीया ले गयो रे मेरा हे गाणे साकारण्याची संधी मिळाली. या काळात तिचे आणि चंपकलाल झवेरी यांचा परिचय झाला, त्यांची बहीण बिदूची मैत्रीण होती, त्यातून हे सगळे घडलं आणि मग त्यांचे १९६४ लग्नही झाले. चंपकलाल झवेरी यांनी बिंदूच्या कुटुंबातील एक होणं पसंत केले आणि अशातच एकदा ते त्यांचा परिचय असलेल्या अभिनेता चंद्रशेखर यांच्या एका पार्टीत आपली पत्नी बिंदू आणि तिची बहीण जया यांना नेले असता तेथे संगीतकार लक्ष्मीकांत ( प्यारेलाल यांचे सहकारी) यांची जयाशी ओळख झाली आणि काही काळाने त्यांचे लग्नही झाले. अशातच काही दिवसांनी लक्ष्मीकांत यांना आपल्या पत्नीसह बिंदूनी आपल्या घरी जेवायला बोलावले असता बहिण आली पण लक्ष्मीकांत यांना यायला उशीर का होतेय हे पाहण्यासाठी बिंदू आपल्या वांद्य्रातील घराजवळ असलेल्या मेहबूब स्टुडिओतील रेकार्डिग स्टुडिओत गेली. तेथे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे राज खोसला दिग्दर्शित अनिता या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतावर काम करत होते. बिंदूला पाहताच राज खोसला यांनी लक्ष्मीकांत यांना विचारले, ही कोण? ते म्हणाले, माझी मेव्हणी. राज खोसला म्हणाले, माझ्या पुढच्या चित्रपटात ती भूमिका करेल काय? नकारात्मक शेडची आहे. लक्ष्मीकांतजी म्हणाले, तिलाच विचारा. बिंदूच्या मनात आपण नायिका व्हावे असे होते आणि थोडेफार मॉडेलिग करून मुद्रित माध्यमातील जाहिरातीसाठी फोटो सेशन) तिची वाटचाल सुरू होती. राज खोसला यांनी बिंदूला आपल्या आगामी चित्रपटाबाबत कल्पना दिली. चंद्रकांत काकोडकर यांच्या निलाबरी या कादंबरीवर आधारित आपण दो रास्ते “ हा चित्रपट निर्माण करत आहोत. या चित्रपटात राजेश खन्ना आणि मुमताज नायक नायिका आहेत. नीला ही एका एकत्र कुटुंबात भांडणे लावते, तीन भावांमध्ये फूट पाडते. या चित्रपटाच्या कथेची नायिका नीला“ आहे. आणि प्रेम चोप्रा पतीच्या भूमिकेत आहे. लक्ष्मीकांत आणि बिंदू यांनी सांगितले, आम्ही आठ दहा दिवसांत विचार करून काय ते सांगतो. आठवडाभरानंतर लक्ष्मीकांतजी म्हणाले, एक चित्रपट करायला काय हरकत आहे? राज खोसला यांनी बिंदूची स्क्रीन टेस्ट करायचे ठरवले. आणि त्यासाठी त्यांनी बिंदूला आपल्या चिराग या चित्रपटाच्या सेटवर बोलावले. तेव्हा महेश भट्ट राज खोसलाकडे सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांनी बिंदूला चिराग या चित्रपटातील आशा पारेखचे काही संवाद बोलायला सांगितले. बिंदूने
त्यात छान रंग भरला आणि
तिची निवड झाली.
राज खोसला दिग्दर्शित चित्रपटात भूमिका म्हणजे अन्य दिग्दर्शकांचे लक्ष आपोआपच त्या कलाकाराकडे जाणार. नतिजा या चित्रपटात बिंदूला चक्क विनोद खन्नाची नायिका साकारायला मिळाली. हा चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लँक ॲण्ड व्हाईट होता. बी. आर. फिल्म निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक मध्ये राजेश खन्ना, नंदा, सुजीतकुमार यांच्यासोबत छोटी भूमिका मिळाली. हे तीनही चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाले. इत्तेफाक हिट झाला. दो रास्ते सुपर डुपर हिट ठरला आणि बिंदू नावाचे एक भन्नाट पर्व सुरू झाले. या चित्रपटातील बिंदूच्या अदाकारीचे या चित्रपटाच्या मेट्रो चित्रपटगृहातील प्रीमियरपासूनच कौतुक सुरु झाले आणि चित्रपटाने ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात पन्नास आठवड्याचा मुक्काम करताना चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि प्रसार माध्यमांचे बिंदूकडे लक्ष लागले. शक्ती सामंता यांनी आपल्या दिग्दर्शनातील कटी पतंग मध्ये प्यार से लोग मुझे शब्बो कहते है या आक्रमक क्लब डान्स ( की कॅब्रे?) आणि काही नाट्यमय दृश्यांची भूमिका दिली. ही भूमिका आपण स्वीकारावी की नाही असा बिंदूला प्रश्न पडला होता. कारण, नृत्य गीतासाठी बिनधास्त लूक हवा होता. बिंदूने आपले पती चंपकलाल झवेरी यांच्याशी चर्चा केली आणि मग होकार दिला. हा चित्रपट आणि ही भूमिका सुपर डुपर हिट ठरले आणि बिंदूकडे खरोखरच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची रांग लागली. ती चित्रपट स्वीकारत होती तरी तिच्या मनात आपण नायिका व्हावे हेच होते. त्या दिवसांत मीनाकुमारीचाच मेकअपमन बिंदूचाही अधूनमधून मेकअप करे. मीनाकुमारीने बिंदूला चांगला सल्ला देत म्हटले, सध्या चित्रपटात नकारात्मक भूमिकेचा स्लॉट खाली आहे. त्याचा तुला फायदा होईल. बिंदूने हा सल्ला मानला आणि मग त्या पठडीतील अनेक भूमिका स्वीकारल्या. अमर प्रेम , नेहले पे देहला, दस नंबरी, शंकर शंभू, जोशीला, प्रेम नगर, इम्तिहान, प्रेम शास्त्र, मेरे जीवन साथी, गहरी चाल , नफरत, त्याग, चलता पुर्जा, अशा अनेक चित्रपटांत तिला भूमिका मिळाल्या. दुलाल गुहा दिग्दर्शित दुश्मन (१९७२) या चित्रपटात राजेश खन्नासोबत सच्चाई झुक नहीं सकती असं कोठीवरचे नृत्य गीत मिळाले. सावनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित हवस या चित्रपटात तिला अतिशय धाडसी व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. बिंदूशिवाय या भूमिकेसाठी अन्य कोणाचाही या भूमिकेसाठी विचार करता येणार नाही असे कौतुकाने म्हटले गेले. या चित्रपटातील तिने पडदाभर साकारलेल्या अपने दिल में जगा दिजीए या गाण्यातील तिचं कमालीचं मोहक, मादक, मधाळ रुप भन्नाट आहे.
बिंदू म्हणजे रुपेरी पडद्यावरील एक जहाल व्यक्तीमत्व. कोणतीही सभ्यता, परंपरा, मूल्य न पाळणारी असे काहीसे होते. प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर (१९७३) क्रूरकर्मा तेजा ( अजित) ची मोना डार्लिग तिने भारी रंगवली. दिलजलो का दिल जलाके असं क्लब डान्स गीतही भन्नाट साकारले.
सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांत बिंदू हमखास पाहायला मिळे. वितरकांची तशी मागणीच असे म्हणे. हेदेखील एक प्रकारचे यशच. एस. के. कपूर निर्मित आणि चांद दिग्दर्शित धर्मा (१९७३) चित्रपटातील प्राणसोबतची तिची राज की बात कह दू तो ही कव्वाली सुरु होताच पब्लिक पडद्यावर पैसे उडवत असे अप्सरा थिएटरमध्ये घडत असे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, धर्मा प्रदर्शित झाला तेव्हा वृत्तपत्रात नवीन निश्चल, रेखा याची नावे सुरुवातीला असत. ही कव्वाली सुपर डुपर हिट होताच प्राण, अजित, बिंदू यांची नावे अगोदर येऊ लागली.
ह्रषिकेश मुखर्जी यांनी आपल्या दिग्दर्शनातील अभिमान, चैताली, अर्जुन पंडित या चित्रपटात बिंदूला तिच्या भडक इमेजपेक्षा वेगळ्या दिलेल्या भूमिकाही तिने रंगवल्या. तात्कालिक समिक्षकानी या गोष्टीची दखल घेतली. एक दोन साऊथ इंडियन चित्रपटात तिने भूमिका साकारली. माफीचा साक्षीदार (१९८६) या मराठी चित्रपटात तिचा जीवन में आयी नशा या गाण्यावर भन्नाट क्लब डान्स आहे.
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस बिंदूचा प्रभाव ओसरला. आग शांत होत गेली. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला सुभाष घई दिग्दर्शित हीरो (१९८३) पासून बिंदूने कधी मूळ स्वरूपानुसार पण कौटुंबिक रुपात, तर कधी चक्क विनोदी भूमिकेत
( शोला और शबनम)
काम केले.
बिंदूची जागा घेता येणे शक्य नव्हते. ती घातक नजर आणणार कुठून? बिंदूने राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (१९९४) मधील भूमिका एन्जॉय केली. अधूनमधून एखाद्या चित्रपटात ती दिसे. मेहुलकुमार दिग्दर्शित क्रांतीवीर (१९९४) च्या फिल्मालय स्टुडिओतील सेटवर आम्हा सिनेपत्रकाराना शूटींग रिपोर्टीगसाठी आमंत्रित केले असता नाना पाटेकर आणि बिंदू यांच्यावर क्लब गीत नृत्याचे चित्रीकरण सुरू होते, असं लाईव्ह कव्हरेज म्हणजे आम्हा सिनेपत्रकाराना जणू खुराकच. दोघेही एकदम भारी आणि फॉर्मात होतेच. याच वेळी बिंदूच्या अतिशय दिलखुलास मुलाखतीचा योग आला. यादगार पल ठरला.
नवीन शतकात सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टी बदलत गेली, एव्हाना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यांची बरीच पुढची पिढी आली होती, बिंदूला त्यात तसं स्थान नव्हते.
फराह खानने ओम शांती ओम (२००६) या चित्रपटात तिला
एक भूमिका दिली. बिंदूचा चार्म हरवला होता. मेकअपचा थर जाणवत होता. बिंदूने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले. पूर्वी निदान फिल्मी पार्टीत दिसायची, आता तेही नाही.
चित्रपटसृष्टी कोणासाठी थांबत नाही. नवीन पिढीसाठी बिंदू मागील काळात जमा झाली होती. माझी पिढी यू ट्यूबवर अनहोनी चित्रपटातील हंगामा हो गया पाहताना जुन्या आठवणीत जाते. सत्तर ऐंशीच्या दशकाच्या फ्लॅशबॅकमध्ये जात.
बिंदूचे आपलं एक व्यक्तीमत्व आहे ( वा होते), आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या पतीला म्हणजे चंपकलाल झवेरी यांना देते.
तिच्या वाढदिवसानिमित्त तिची आठवण आली म्हणून लिहिले.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper