भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही बदल हे परंपरा आणि नवता यांचा छान सुरेख संगम असतो.
भारतमाता चित्रपटगृहाच्या बाबतीत तेच झाले आहे. त्याच्या मूळ इमारतीचा ढाचा अजिबात न बदलता अंतर्गत रचनेत आधुनिक बदल करण्यात आले आहेत. आता डॉल्बी स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम आणि टू के प्रोजेक्शन अशा आधुनिक तंत्रज्ञानासह ते आहे. आजच्या डिजिटल पिढीला चित्रपट म्हणजे फक्त आणि फक्त पडद्यावर गोष्ट पाह्यची नसते तर त्याना काही भन्नाट आणि रंजक अनुभवही घ्यायचा असतो. तसा आधुनिक बदल या नवीन भारतमाता चित्रपटगृहात आहे. आणि त्याची जणू चुणूक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर २’ हा चित्रपट येथे देत आहे. भारतमाता चित्रपटगृहाचे नूतनीकरण झाल्यानंतर पहिला चित्रपट हिंदी नव्हे तर मराठी असता तर अधिक सयुक्तिक ठरले असते हे खरेच आहे. त्याचप्रमाणे ढोल ताशा पथक आणून ते व्हायला हवं होतं हेदेखील खरेच.
मराठी चित्रपटाच्या चौफेर आणि दीर्घकालीन गौरवशाली इतिहासात काही चित्रपटगृहाचा विशेष सहभाग आहेच आहे. याचीही दखल घ्यायला हवी. मराठी चित्रपट रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या अशा चित्रपटगृहाचा विशेष सहभाग आहे. खरं तर एकूणच चित्रपटगृहाचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.आणि त्यात एक भारतमाता चित्रपटगृह. आपलं वाटावं असं चित्रपटगृह.
मुंबईतील गिरणगावातील हे चित्रपटगृह. लालबाग, परळ, काळा चौकी, भोईवाडा, भायखळा, सात रस्ता, लोअर परेल या परिसरातील मराठी चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांसोबत या चित्रपटगृहाची यशस्वी उल्लेखनीय वाटचाल आहे.
कोरोना काळात येथील खेळ थांबला. पण आता नवीन आकर्षक रुपडे घेऊन हे चित्रपटगृह लक्ष वेधून घेत आहे. आज वर्षभरात शंभर सव्वाशे मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना त्यांच्यासाठी हे एक हक्काचे असे चित्रपटगृह आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला उच्च दर्जाच्या अत्याधुनिक तांत्रिक सुविधा असलेल्या चित्रपटगृहात चित्रपट पाह्यचा असतो, मल्टीप्लेक्स कल्चरने त्यांना ती सवय लावली आहे, तसा फिल त्यांना नवीन रंगरुप असलेल्या भारतमाता चित्रपटगृहात अनुभवावयास मिळाले तर चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी सुपर डुपर हिट ठरलाच समजा. सोशल मीडियावर या भारतमाता चित्रपटगृहावरचे रिल व्हायरल होत आहे, प्रसार माध्यमातून भारतमाता पुन्हा एकदा सुरु अशा बातम्या येता आहेत, स्फूट येत आहे.
जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांनी “पब्लिकने पिक्चर्स” डोक्यावर घेतले इतकेच नव्हे तर, त्या चित्रपटगृहाशीही कळत नकळत भावनिक नाते निर्माण झाले.चित्रपटाचा अभ्यास करताना हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. चित्रपट कसा आहे हे महत्त्वाचे तसेच तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोहचला तेदेखील तितकेच महत्त्वाचे. तो एक वेगळाच अनुभव.
दक्षिण मुंबईतील गिरगावात लहानाचा मोठा होताना माझीही काही आवडती सिंगल स्क्रीन थिएटर्स होती, त्यातील बरीच काळाच्या पडद्याआड गेली. पण आठवणी कायम आहेत. आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिक मल्टीप्लेक्स, त्याच मल्टीप्लेक्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, साऊंड सिस्टीम,
यू ट्यूब, ओटीटीवर मुव्हीज पाहताहेत. (ही पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते). त्यांना अशा अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या वाटचाल आणि रसिकांच्या प्रेमाची कल्पना असेल अथवा कदाचित नसेलही. आणि काळ कोणासाठीही थांबत नाही, म्हणून तर नवीन गोष्टींचे स्वागत हवेच आहे. जुन्या काळातील चित्रपट रसिकांनी चित्रपटाकडून फक्त आणि फक्त मनोरंजन ,मनोरंजन मनोरंजन याचीच अपेक्षा ठेवली, आजच्या चित्रपट रसिकांना आपण चित्रपट कसा पाहतोय, अद्ययावत सुविधा आहेत ना हे महत्त्वाचे झाले आहे.
मी पहिल्यांदा भारतमाता चित्रपटगृह पाहिले ते लहानपणी पालकांसोबत लालबागचे गणपती पाह्यला जायचो तेव्हा. गणेश गल्लीचा सार्वजनिक गणेशोत्सव हे त्या काळात विशेष आकर्षण असे. तो पाहून झाल्यावर जवळचे भारतमाता चित्रपटगृह दिसायचे. नजर जायचीच. तेथे हमखास मराठी चित्रपट लागल्याचे दिसे. गिरणगावातील अस्सल मराठमोळे चित्रपटगृह ही त्याची ओळख.
अनेक चाळी आणि कष्टकरी कामगार वर्ग हे या विभागाचे वैशिष्ट्य. मध्यमवर्गीय कुटुंबांचे येथे दीर्घकालीन राहणीमान. (आजचे परेल थोडं बदललंय.)
गिरगावातील आमच्या खोताची वाडी आणि शेजारच्या आंबेवाडी, कुडाळेश्वर वाडीच्या समोरच मॅजेस्टिक थिएटर होते. आयुष्यात पाहिलेले हे पहिलेच सिनेमा थिएटर. मग जवळचे सेन्ट्रल मग रॉक्सी, त्यानंतर ऑपेरा हाऊस वगैरे.
कॉलेजमध्ये असताना दक्षिण मध्य मुंबईतील वरळी नाक्यावरील लोटस, नागपाड्यातील अलेक्झांड्रा, भायखळ्याचे पॅलेस असे एकेक करत अन्य चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू लागलो आणि मराठी चित्रपट पाहण्यासाठी भारतमाता हुकमी ठरले. गिरगावातून ६१, ६५, ६६, ६९ यापैकी कोणतीही बेस्ट बस पकडून दहा पैशात भारतमाता चित्रपटगृहात पोहचवे. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात तेथे मी चांदोबा चांदोबा भागलास का, सासुरवाशीण, चोरीचा मामला, शूरा मी वंदिले हे चित्रपट पाहिले. हे कृष्ण धवल अर्थात ब्लँक ॲण्ड व्हाईट चित्रपट. मराठीत तोपर्यंत रंगीत चित्रपट पडद्यावर येत होते तरीही काही चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असत. दादा कोंडके यांचा ‘ पांडू हवालदार ‘ ही ब्लॅक अँड व्हाईट असला तरी मनोरंजनाच्या रंग काही वेगळाच.
गिरगावातील मॅजेस्टिक थिएटर हे खरं तर मराठी चित्रपटाचे हुकमी. १९७३ साली ते पाडल्यावर सेन्ट्रलला मराठी चित्रपट प्रदर्शित होवू लागले. पण तेथे मनमोहन देसाई दिग्दर्शित चाचा भतीजा आणि परवरीश, सी. पी. दीक्षित दिग्दर्शित “फकिरा” अशा अनेक सुपर हिट चित्रपटांनी रौप्य महोत्सवी अर्थात पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केल्याने अनेक मराठी चित्रपट आमच्या गिरगावात आलेच नाहीत. अष्टविनायक वगैरे सेन्ट्रलला मॅटीनी शोला आले. रॉक्सीलाही मराठी चित्रपट प्रदर्शित होत. पण भारतमाता, दादरचे प्लाझा व कोहिनूर (आताचे नक्षत्र) मराठीसाठी हुकमी.
मिडियात आल्यावर भारतमाताचे सर्वेसर्वा बाबासाहेब भोपटकर यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध निर्माण झाले. अतिशय सज्जन माणूस. अनेक मराठी चित्रपटांचे मुहूर्त अथवा शूटिंग पूर्ण झाल्यावर निगेटिव्ह कटींग त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येई. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण अतिशय निकोप आणि आपलेपणाचे होते. अनेकांशी सहज संवाद होत असे. त्यातून चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी समजत. अनेक मराठी चित्रपटांचे प्रीमियरही भारतमातामध्ये होत. महेश कोठारे दिग्दर्शित “धूम धडाका”चा जंगी प्रीमियर येथेच रंगला. भारतमाता चित्रपटगृहात आपला मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून अनेक निर्माते बराच काळ वाटही पाहत याचे किस्सेही बरेच.
भारतमाता जुन्या वळणाचे असले तरी तेथील मराठी ठसा आपलासा वाटे. १९८२ साली गिरणी संप सुरु झाल्यावर भारतमातामधील गर्दी कमी झाल्याच्या बातम्या होत्या. याच वर्षी देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले. सत्यनारायणाची पूजा असो, वाढदिवस असो, बारसं असो, चाळीचाळीतून भाड्याने व्हीसीआर आणून तब्बल चार चित्रपट पाहता येवू लागल्याने चित्रपटगृहात जाणे एकूणच कमी होत गेले. त्यात दादा कोंडके, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटाचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केला. त्यात राज्यातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स हाऊसफुल्ल गर्दीत वाटचाल करत करत मराठी चित्रपटाची वैशिष्ट्य अधोरेखित करत राहिले ( आज त्याचीच गोड फळे मिळताहेत. आजच्या मराठी चित्रपटसृष्टीला मल्टीप्लेक्स कल्चर जवळचं. ) कालांतराने कपिल भोपटकरशी चांगले संबंध निर्माण झाल्यावर भारतमाता अधिकच आपलेसे झाले. मल्टीप्लेक्स युगात मुंबईसह देशातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत गेली, नवीन पिढीला चकाचकपणाची सवय लागत गेली, काही महाराष्ट्रीय कुटुंबातही नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग आला. जुनी चित्रपटगृह चालवणे, टिकवणे, सांभाळणे अवघड होत गेले. काही चित्रपटगृहांनी कात टाकली. ( भायखळ्याचे जयहिंद तसेच बदलले) भारतमाता आता अशाच काही नवीन गोष्टींसह आलं आहे. मुक्ता ए २ यांच्या वतीने ते कार्यरत.
भारतमाता १९४१ साली सुरु झाले. त्या काळातील मराठी व हिंदी चित्रपटांनी ते वाटचाल करत राहिले. तेथे प्रदर्शित झालेले काही मराठी चित्रपट, सुगंधी कट्टा, पुढारी, भाग्यवती मी या संसारी, सून माझी सावित्री, असला नवरा नको ग बाई, अजब तुझे सरकार, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, मुंबईचा फौजदार, जावई विकत घेणे आहे, तुच माझी राणी, आंधळा मारतो डोळा, जिद्द, सर्वसाक्षी, शूरा मी वंदिले, धरतीची लेकरं, ज्योतिबाचा नवस, पांडू हवालदार, गल्ली ते दिल्ली, गंमत जंमत, मानाचा मुजरा, अष्टविनायक, पुढचं पाऊल, दगा, सगेसोयरे, मला देव भटाला, नाव मोठं लक्षण खोटं, चुडा तुझा सावित्रीचा, बायानों नवरे सांभाळा, तुमची खुशी हाच माझा सौदा, पाहुणी वगैरे अनेक.
कालांतराने सैराटने येथे भरघोस यश प्राप्त केले.
भारतमाताच्या अनेक वैशिष्ट्यांतील आणखीन एक विशेष, अनेक वर्ष तेथे दादा कोंडके यांचे सर्वकालीन सुपर हिट चित्रपट रिपीट रनला प्रदर्शित होत राहिले आणि मागील व पुढील पिढीतील रसिकांनी ते एकत्र एन्जॉय केले. तुमचं आमचं जमलं, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार इत्यादी दादा कोंडकेपटांना पुन्हा पुन्हा मोठ्या पडद्यावर पाह्यचा आनंद भारतमाताने दिला.चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित “पिंजरा” देखिल काही वर्षांनी येथेच रिपीट रनला प्रदर्शित झाला आणि पूर्वीसारखीच गर्दी
भारतमाता जुन्या मुंबईची ओळख तसेच मराठी चित्रपटाच्या इतिहासाची साक्षीदार, साथीदार वास्तू. ती पुन्हा कार्यरत होतेय तर मलाही पुन्हा जायलाच हवे. मी तर जाणार. मी या चित्रपटगृहाशी “एक सामान्य प्रेक्षक” म्हणून जोडला गेलो आणि तेच घट्ट नाते आजही कायम आहे. सत्तरच्या दशकापासून माझा या वास्तूशी परिचय आहे.
मुंबईतील एकेक करत करत अनेक एकपडदा चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेली. तर काही चित्रपटगृहानी झक्कास कात टाकली. भायखळा येथील जयहिंद, दादर येथील चित्रा, माहिम येथील सिटीलाईट, बोरिवली येथील अजंठा अशा काही चित्रपटगृहाचा विशेष उल्लेख हवा. दादरच्या रानडे रोडवरील कोहिनूर चित्रपटगृहाच्या जागेवर नक्षत्र उभे राहिले.
चित्रपट मोठ्या पडद्यावर पहावा हे चित्रपट रसिक जाणतात, पण चित्रपट त्यांना आवडायला हवा…. आणि चित्रपटगृह झक्कास असेल तर मस्तच. भारतमाता चित्रपट आता तसेच. मुंबईतील अनेक जुनी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स अशी कात टाकून नव्याने सुरू झाली तर त्यात आनंद आहेच. तसेच त्यामुळे त्या जुन्या चित्रपटगृहाचा फ्लॅशबॅकही समोर येईल हेदेखील एक वैशिष्ट्य आहे.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper