जंगी कुस्ती स्पर्धेला हजारोंचा प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य-दिव्य आयोजनाचा दिमाख अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” ही जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली. भाजपचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कामोठे सेक्टर ६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः “मिनी महाराष्ट्र केसरी”चा अनुभव उपस्थितांना दिला. नेपाळ, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पहायला मिळाला. यामधील मुख्य स्पर्धेतील विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कुस्ती सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पनवेलचे महापौर नितीन पाटील, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नगरसेवक रवींद्र जोशी, शशिकांत शेळके, अजय बहिरा, राजेंद्र शर्मा, डॉ. अरुणकुमार भगत, एकनाथ गायकवाड, नगरसेविका शीला भगत, रूचिता लोंढे, अस्मिता घरत, सरस्वती काथारा, प्रतिभा भोईर, कुसुम म्हात्रे, माजी नगरसेवक पापा पटेल, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, अनेश ढवळे, राजेश गायकर, योगेश लहाने, नवीन पनवेल युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम, सुशील शर्मा, हर्षवर्धन पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, कुस्तीगीर संघटनेचे बळीराम पाटील, आयोजक नगरसेवक हॅप्पी सिंग, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रसिद्ध कुस्तीपटू आणि प्रशिक्षक रूपेश पावशे, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्ष वनिता पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पैलवान, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवानेते परेश ठाकूर यांचा अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, माझा आणि कुस्तीचा थेट संबंध दिसेल असे वाटत नाही, कारण आमचा आखाडा वेगळा आहे. आमचा आखाडा हिंदुत्वाचा असून आम्ही रोज ‘हिरवे साप’ ठेचतो. त्यामुळे या आखाड्यात आणि आमच्या आखाड्यात फरक आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले, साधारणपणे एवढी भव्य कुस्ती स्पर्धा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच पहायला मिळते असा एक समज आहे, मात्र आज कामोठ्यात झालेली ही गर्दी आणि आयोजन पाहिल्यानंतर आम्हीही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कुठेही कमी नाही, असाच स्पष्ट संदेश परेश ठाकूर यांच्या माध्यमातून गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणे हे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाची वाढती ताकद दाखवणारे असून त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे सांगून ना. राणे यांनी वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. या भव्य परेश ठाकूर केसरी कुस्ती स्पर्धेने संपूर्ण पनवेल आणि रायगड जिल्ह्यात एक नवा इतिहास रचला असून या अभूतपूर्व क्रीडा सोहळ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे दोन्ही सुपुत्र करत आले आहेत. ते शांत पण धाडसी व्यक्तिमत्व असून लोकांना आधार आणि मदत देण्याचे काम करत असतात. कुस्ती आणि माझे जवळचे नाते आहे. ही स्पर्धा अत्यंत सुरेख असा अनुभवायला मिळाला, अशा शब्दात खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या, तर आमदार निरंजन डावखरे यांनी कोकणच्या भूमीत पण कुस्तीवर प्रेम करणारी लोकं आहेत हे या कुस्ती सामन्यातून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचकारी ठरला. मुख्य कुस्तीमध्ये रुस्तम-ए-हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध पै. बागा सिंघ, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै. संदीप कुमार तसेच महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माउली कोकाटे यांच्या लढतींनी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहचवला. महिला गटातील सामनेही आकर्षणाचे केंद्र ठरले. पै. अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै. एकता शर्मा, पै. पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतिका पवार तसेच नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै. रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची पै. कोमल यांच्या लढतींना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत जवळपास ७५ सामने खेळविण्यात आले. विजेत्या मल्लांसाठी तब्बल १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्थानिक आणि ग्रामीण भागातील नवोदित मल्लांनाही या व्यासपीठावर संधी देण्यात आल्याने अनेक तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. स्पर्धेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भव्य मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय सुविधा, हलगीचा ताल, मर्दानी आवाजात सूत्रसंचालन, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे स्पर्धेचे आयोजन सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले.
युवा नेते परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. युवकांना प्रोत्साहन मिळावे, ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहचावी, या उद्देशाने ते सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.
अशा रंगल्या मुख्य लढती
रुस्तम-ए-हिंद सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल लाली चमकोर = सिकंदर शेख विजयी
उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध पै. बागा सिंघ = किरण भगत विजयी
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी संदीप कुमार = विजय चौधरी विजयी
महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे = कुस्ती बरोबरीत सुटली
अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती एकता शर्मा = एकता शर्मा विजयी
पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार = वेदांतिका पवार विजयी
नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची कोमल = रुबी थापा विजयी
RamPrahar – The Panvel Daily Paper