Breaking News

स्वप्नपूर्ती संकुलात कुत्र्यांची दहशत

पनवेल ः वार्ताहर

खारघरमधील सेक्टर 36 मध्ये सिडकोकडून उभारण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलात सध्या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. संकुलात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संकुलातील रहिवाशांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पात सुमारे 3700 घरे असून, जवळपास 10 हजारांहून अधिक रहिवासी येथे वास्तव्यास आहेत. या संकुलात दोन वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मुख्यत्वे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांवर भुंकणे व त्यांच्या अंगावर धावून जाणे हे नित्याचेच झाले आहे. लहान मुलांसह काही रहिवाशांवर या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. स्वप्नपूर्ती संकुलात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण रात्री उशिरा कामावरून घरी येत असताना संकुलात प्रवेश करण्यापूर्वी ही कुत्री अंगावर धावून जातात. यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. सर्व कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांनी याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अडसर दूर झाला आहे. लवकरच यावर तोडगा काढून स्वप्नपूर्ती संकुलातील रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन सकारात्मक पाऊल उचलले जाईल.

-गणेश देशमुख, आयुक्त

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply