कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश विदेशातील अनेक भाषेतील चित्रपट दाखविण्यात आले. त्यातून जगभरातील अनेक देशांतील चित्रपटात आलेल्या नवीन आशय, विषय, दिग्दर्शकांचा दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचे दर्शन घडले. मराठी चित्रपट रसिकांसाठी या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वाधिक लक्षवेधक गोष्ट म्हणजे रेड कार्पेटवर आपल्या अशोक सराफ आणि निवेदिता यांची लक्षवेधक उपस्थिती.
प्रसारमाध्यमातून या गोष्टीला भरभरुन कव्हरेज मिळाले (अनेक सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या) आणि अशोक सराफ आणि निवेदिताचे मराठी चित्रपट रसिकांनी भरभरुन कौतुक केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त, पद्मश्री अशोक सराफ यांच्या कारकीर्दीतील हा आणखी एक मोलाचा क्षण. अशोक सराफ अफाट प्रतिभेचा कलाकार. खरं तर नायक, खलनायक, सहाय्यक भूमिका, चरित्र भूमिका अशी त्यांची चौफेर वाटचाल सुरू आहे. ते फक्त आणि फक्त विनोदी अभिनेता नाहीत. त्यांनी विनोदी व्यक्तीरेखा साकारल्या, म्हणजे ते विनोदी कलाकार होत नाही, असं खुद्द अशोक सराफचेही म्हणणं आहे. अशोक सराफशी माझा दीर्घकालीन परिचय. अगदी अशोक सराफच्या ग्रॅण्ड रोड येथील चिखलवाडीतील घरीदेखील मी गेलो आहे.
एका भेटीत अशोक सराफनी मला सांगितले, (अशोक सराफ भडाभडा बोलणारी व्यक्ती नाही. चांगला परिचय झाल्यावरच मोकळेपणाने बोलणार हा माझा स्वानुभव) मी केवळ विनोदच करतो असं नाही. त्यामुळे अशोक मा. मा. या मालिकेतली भूमिका विनोदी नाही हे कळल्यावर समाधान वाटलं’; त्यांनी सांगितले, ‘अशोक मा. मा.’ या मालिकेतली माझी व्यक्तिरेखा खऱ्या अशोक मामांसारखी मुळीच नाही. अशोक माधव माजगांवकर असं मालिकेतल्या भूमिकेचं पूर्ण नाव आहे हे आता वेगळे सांगायला नकोच. आता ही मालिका संपून बरेच दिवस झाले आहेत. ही व्यक्तिरेखा विनोदी नाही याचा मला अधिक आनंद झाला होता. कारण, मी केवळ विनोदच करतो असं नाही. वास्तविक जीवनात तुमच्या आजूबाजूला असलेल्या माणसाचं प्रतिबिंब मालिकेत दिसले, अशीच मला अनेकांकडून प्रतिक्रिया मिळाली. माजगांवकर हा तत्त्वनिष्ठ होता. ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हे त्याचं ब्रीदवाक्य असतं. या पात्राला विविध छटा असल्याने ही भूमिका साकारताना मजा आली. खूप एन्जॉय केली मी ही मालिका. अंधेरी पश्चिमेकडील माझ्या घरुन अंधेरी पूर्वेकडील सेटवर ये जा करणे म्हणूनच कधी कंटाळवाणे वाटले नाही.
अशोक सराफनी पुढे सांगितले, मध्यंतरीच्या वर्षांत मला मालिकांसाठी कोणी विचारलंच नाही. यावेळी मात्र वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी निर्माती निवेदिता सराफला सांगितलं की निवेदितानं केदारला सांगितलं हे काही मला माहिती नाही. काही घडामोडी घडल्या हे नक्की. पण घरातूनच पहिल्यांदा विचारणा झाल्यामुळे माझ्याकडे होकार देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. ‘सही रे सही’पासून ‘बाईपण भारी देवा’ अशा दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत असा केदार शिंदे या मालिकेशी जोडला गेला आहे; त्यामुळे मला अपेक्षित असलेलं वेगळेपण मालिकेत नक्की असणार याची खात्री पटली. चित्रीकरणाचं काम सुरू झाल्यावर ही मालिका खरंच वेगळी आहे हे अधोरेखित झालं. अशोक सराफ यांच्या म्हणण्याचा प्रत्यय ही मालिका प्रक्षेपित झाल्यावर आलाच.
अशोक सराफ आणखीन काही गोष्टींवर भाष्य केले , नवोदित कलाकार माझ्यासोबत काम करताना मला घाबरतात का ते मला माहित नाही, तर माझ्या ‘सिनियॉरिटी’ला ते घाबरतात. मी मात्र नेहमी सेटवर पहिल्या भेटीतच त्यांना आपलंस करतो; रिलॅक्स झोन देतो, जेणेकरून त्यांना काम करताना दडपण येणार नाही. मीच अनेकदा पुढाकार घेऊन त्यांच्याशी गप्पा मारतो; कुठून आलात, कसं आलात वगैरे वगैरे विचारपूस करतो. आमच्या सेटवर बालकलाकारदेखील होते. खूप धमाल , मौजमजा करत. पण ‘ॲक्शन’ म्हटल्यावर तितकंच तन्मयतेनं ते कामही करत हे जास्त महत्वाचे. अशोक सराफनी याच गप्पांत सांगितले, मी अनेक वर्षे अनेक मराठी हिंदी मालिका आवडीनं पाहतो. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका मला आवडायची. निवेदिता काम करत असल्यामुळे ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिकाही मी पाहायचो. आता मी आणि निवेदिता आम्ही दोघंही एकाच वेळी टीव्ही माध्यमात काम करतोय. त्यामुळे यापुढे निवेदिता माझी मालिका पाहणार आणि मी तिची! अशोक सराफ सहज गंमत म्हणून म्हणाले.
‘हम पांच’पासून ते आता ‘अशोक मा.मा.’ या मालिकेपर्यंत अठ्ठावीस तीस वर्षात अशोक सराफ यांना स्वाभाविकपणे काही फरक जाणवतोय. तेव्हाची काम करण्याची पद्धत अत्यंत साधी होती. सुरुवातीला ‘हम पांच’वर काहीशी टीका झाली. कारण, ती मालिका तेव्हाच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी होती. तशा धाटणीची मालिका तोवर कोणी हाताळली नव्हती. मालिकेचे लेखक इम्तियाज पटेल रोज वर्तमानपत्रात एक वाक्य वाचायचे आणि त्यावर मालिकेचा पूर्ण भाग लिहायचे; इतके ते मातब्बर होते. मालिकेतल्या माथुर कुटुंबात सात महिला आणि मी एकटा पुरुष अशा विभिन्न व्यक्तिरेखा होत्या. माझ्या पाच मुली, फोटोत दिसणारी पहिली बायको आणि घरात असणारी दुसरी बायको अशा सात जणींमध्ये मी वावरायचो. आजसारखं पूर्वी अद्ययावत तंत्र नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार एका रांगेत उभं राहायचो आणि आपापली वाक्य कॅमेऱ्यासमोर बोलायचो; त्यामुळे ती सरळसोट वाटायची. तरीही ती मालिका प्रेक्षकांना आवडली; खूप मनोरंजन करणारी ठरली.कारण आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. तसंच यावेळी ‘अशोक मा. मा’ या मालिकेतूनही आम्ही नवं देण्याचा प्रयत्न केला.
अशोक सराफना आजूबाजूच्या अनेक गोष्टींचे भान असते हा माझा दीर्घकालीन अनुभव. अशोक सराफ येथेच इतरांपासून वेगळे.आज जुने हिंदी चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असले तरी मराठी सिनेमे पुनर्प्रदर्शित होऊ नयेत. कारण, मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे फक्त टीव्हीवर पुन्हा-पुन्हा पाहतात. हिंदी सिनेमांचा प्रेक्षक आणि त्यांची मानसिकता वेगळी आहे. हिंदी सिनेमांची धाटणी वेगळी आहे. तो पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहात जातो. तोलून, मापून पाहणारा चोखंदळ असा मराठी रसिक प्रेक्षक आहे. मराठीच्या बाबतीत तसं घडत नाही.
मागे वळून पाहताना कोणत्या भूमिका अशोक सराफ यांच्या स्मरणात आहेत यावर ते म्हणतात, मी साधारण अडीचशेच्या आसपास मराठी-हिंदी सिनेमे केले असतील. अगदी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रपटापासून ते आता ‘डिजिटल’पर्यंतच्या सर्व भूमिका माझ्या स्मरणात नसल्या तरी त्या प्रेक्षकांच्या मात्र आठवणीत असतील. ‘बिनकामाचा नवरा’मधला कामधाम न करणारा नवरा तुकाराम, ‘सासू वरचढ जावई’मधला इरसाल जावई, ‘एक डाव भुताचा’मधलं सरदाराचं भूत, ‘गुपचूप गुपचूप’मधले प्रा. धोंड, ‘धुमधडाका’मधला ‘व्याख्ख्या विख्खी व्यूख्खू….’ करणारा महेशचा मित्र कम इरसाल म्हातारा, ‘प्रेम करू या खुल्लम खुल्ला’चा बजरंग, ‘माझा पती करोडपती’चा दिनकर लुकतुके आणि रनगाडे, ‘अशी ही बनवाबनवी’ मधला ‘हा माझा बायको पार्वती’ म्हणणारा धनंजय माने… ही यादी मोठी आहे. दुसरीकडे मी हिंदीतही काम केलं; पण मी तिकडे फार रमलो नाही. तरीही ‘ठाकूर तो गियो…’असं म्हणणारा ‘करण अर्जुन’चा मुंशीजी, ‘येस बॉस’मधला जॉनी अशा काही भूमिका स्मरणात आहेत. अशा या माझ्या विविधांगी भूमिकांवर मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. एक प्रकारे या विविधतेशी अशोक सराफ यांची जोडी जमली असेच म्हणायला हवे. अशोक सराफकडे सांगण्यासारखे बरेच काही आहे हे मला कायमच अनुभवायला मिळाले.
सगळ्याचेच सिक्वेल होणार नाहीत याचे अशोक सराफ यांना भान आहे. ते एकदा मला म्हणाले, ‘‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमाला मिळालं. पण, आता सगळ्याच सिनेमांचे दुसरे भाग बनवता येतील; असं नाही. ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग होऊ शकत नाही. आता ‘ पुन्हा साडे माडे तीन’ सिनेमात मी होतो. त्यात पहिल्या सिनेमातल्याच व्यक्तिरेखा होत्या; परंतु, गोष्ट नवीन होते हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात आले असेलच. माझ्यासाठी या वयात वेगळ्या धाटणीच्या भूमिका लिहिल्या जात नाहीत ही खंत मला आजही वाटते. एखादी नवी भूमिका हाती घेताना मला काहीतरी एकदमच ‘वेगळं’ हवं असतं असं नाही. पण, माझ्या यापूर्वीच्या कामांपेक्षा त्या भूमिका काही प्रमाणात तरी विभिन्न असतील तरी मला अभिनेता म्हणून समाधान मिळतं; ती भूमिका साकारायला उत्साह मिळतो.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या कलाकार पती पत्नीबद्द्ल बरेच काही सांगता येईल. निवेदिता यांनी आपल्या वयाहून तब्बल अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या अशोक सराफ यांची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली. दोघेही तेव्हाचे म्हणजे ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार. दोघांची लव्हस्टोरी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत परिचयाची आहे. चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांच्या लाडक्या मामांच्या प्रेमात पडणाऱ्या निवेदिता सराफ मागील तीन साडेतीन दशकापासून अधिक काळ मामांची सावली बनून उभ्या आहेत. एक आदर्श जोडपं म्हणून दोघांकडे पाहिलं जातं.
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से आहेत. ‘अशीही बनवा बनवी’, ‘धुम धडाका’, ‘माझा छकुला’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘मामला पोरीचा’ अशा अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. अशोक मामांना त्यांच्या प्रेमाची पहिली कबूली ही रमेश साळगावकर दिग्दर्शित “मामला पोरीचा” या सिनेमाच्या सेटवर मिळाली होती. अशोक मामांनी स्वत: हा किस्सा सर्वांबरोबर शेअर केलाय.
अशोक सराफ आणि निवेदिता “मामला पोरीचा” या सिनेमात एकत्र काम करत होते. एके दिवशी शुटींगचं लवकर पॅकअप झालं आणि निवेदिता सराफ अशोक मामांकडे आल्या. तेव्हा निवेदिता अशोक मामांना अहो जाओ करत होत्या. त्या त्यांना फिल्मी पध्दतीने अशोकजी म्हणायच्या. निवेदिता अशोक मामांकडे गेल्या आणि त्यांना अशोकजी बाय बाय असं म्हणाल्या. निवेदिता त्यांना बाय म्हणून निघून जात आहेत हे बघून अशोक मामांना थोडं वाईट वाटलं होतं पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवलं नाही.
निवेदिता सेटवरून निघाल्या. सेटच्या दरवाज्याच्या दिशेने जायला निघाल्या. त्या दरवाज्याला मध्ये मध्ये गॅप होत्या. त्या गॅपमधून समोर जात असलेली व्यक्त स्पष्ट दिसायची. निवेदिता निघाल्या तेव्हा अशोक मामा दरवाज्याच्या त्या गॅपमधून त्यांच्याकडे बघत होते. निवेदिता देखील दरवाज्यात जाऊन त्या गॅपमधून माझ्याकडे बघणार याची खात्री मामांना होती आणि अगदी तसंच झालं. निवेदिता दरवाज्याजवळ गेल्या आणि त्यांनी त्या गॅपमधून अशोक मामांकडे वळून पाहिलं. तिथेच मामांना कळलं होतं की निवेदिता आपल्या प्रेमात आहे आणि आपल्या प्रेमाची नय्या पार झाली आहे. हे अशोक सराफच्या लक्षात आले. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या यशस्वी नात्याच्या वाटचालीतील कान्स चित्रपट महोत्सवातील त्याची रेड कार्पेटवरील लक्षवेधक उपस्थिती हे आणखी एक विशेष उल्लेखनीय पाऊल.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper