पेण : प्रतिनिधी
ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले.
एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव किशोर पाटील, संयुक्त कृती समितीचे राजू मोरे, किरण प्रधान, नामदेव डोंबाळे, चेतन भोईर, सुरेश गोसावी आदी पदाधिकार्यांसह राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य या संपात सहभागी झाले होते. वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खारकर यांनी या संपाला पाठिंबा जाहीर केला.
महावितरणचे मुरूडमधील अभियंते संपात सहभागी
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील महावितरणचे सहा अभियंते व उपमुख्य कार्यकारी अभियंता हे संपात सहभागी झाले आहेत. मात्र सर्व तांत्रिक कर्मचारी हे कामावर हजर राहिल्याने ग्राहक सेवेवर संपाचा कोणताही परिणाम जाणवला नाही.
महावितरणच्या तिन्ही कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करा, जलविद्युत केंद्र खासगी उद्योजकांना देण्यास विरोध, रिक्त पदाची होणारी दिरंगाई थांबवा, कंपनीतील वरिष्ठ पदावरील भरती, बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप बंद करा, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कर्मचार्यांना 60 वर्षांपर्यंत नोकरीचे संरक्षण देणे या मागण्यांची तड लावण्यासाठी राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने संपाची हाक दिली होती. दरम्यान, संप करणार्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. त्याला न जुमानता महावितरणचे मुरूडमधील अभियंते संपात सहभागी झाले.