भुवनेश्वर : वृत्तसंस्था
येथे 6 जूनपासून सुरू होणार्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी आक्रमक रमनदीप सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनप्रितसिंगला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हॉकी इंडियाने मंगळवारी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत अ गटात भारतासह रशिया, पोलंड व उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. ‘ब’ गटात जपान, मेक्सिको, अमेरिका व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. रमनदीप दुखापतीमुळे सुमारे वर्षभर संघाबाहेर होता. रमनदीपने शेवटचा सामना मागील वर्षी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत खेळला होता. मनदीन सिंग, सिमरनजित सिंग व आकाशदीप सिंग यांच्यावर आघाडीच्या फळीची जबाबदारी असेल. वीरेंद्र लाकडा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. गोलरक्षणाची जबाबदारी पी. आर. श्रीजेश व कृष्णन पाठक यांच्यावर आहे.
भारताचा पहिला सामना रशियाविरुद्ध सहा जून रोजी होणार आहे. या स्पर्धेतून भारताला या वर्षाच्या शेवटी होणाजया ऑलिंम्पिक पात्रता फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले,‘ प्रशिक्षक म्हणून माझी हा पहिली स्पर्धा आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्वाची आहे. आमचा संघ समतोल आहे. आम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजणार नाही.’
- भारतीय हॉकी संघ :
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक.
बचावफळी : हरमनप्रित सिंग, विरेंद्र लाकडा, सुरेंद्र कुमार, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंंग.
मधली फळी : मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित, निलाकांता शर्मा, आक्रमक फळी : मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग, गुरुसाहिबजित सिंग, सिमरनजित सिंग.