मुंबई : प्रतिनिधी
विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल, मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याआधी रिषभ पंतचा अंतिम 15 मध्ये समावेश होईल, असा दावा केला जात होता, परंतु निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकला प्राधान्य दिलं. सूत्रांच्या मते, दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश होऊ शकतो.
बॅकअप म्हणून रिषभ पंतला इंग्लंडला बोलवण्यात आलं आहे, जेणेकरून त्याला इथल्या परिस्थितीचा अंदाज येईल. जर धवन फिट झाला नाही तर आम्ही आयसीसीसमोर ही बाब मांडू आणि मंजुरी मिळाल्यानंतर रिषभला तातडीने टीममध्ये सहभागी करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिषभ पंत गुरुवारी (13 जून) रात्री नॉटिंग्घमला पोहोचेल. त्या दिवशी भारत आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगणार आहे. शिखर धवन जोपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत रिषभ पंत संघात सामील होणार नाही. रिषभ पंतला दिल्लीतील त्याच्या घरी संघाच्या जर्सीपासून अधिकृत वस्तू देण्यात आल्या आहेत. पंत संघात सहभागी झाल्यास तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. तर रोहित शर्मासोबत लोकेश राहुल सलामीला उतरू शकतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंत सामील होऊ शकणार नाही, परंतु पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणार्या सामन्यात रिषभ पंताचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. सूत्रांच्या मते, राहुल आता रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो आणि पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण हा विचार फारच दूरचा आहे. आम्ही सगळ्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहे.