बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरणाचे उद्घाटन
बेलापूर ः प्रतिनिधी
बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईचा मानबिंदू असून अशा प्रकारच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे, असे उद्गार सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काढले. बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण समारंभाचे उद्घाटन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक-1 अशोक शिनगारे, नवी मुंबई मपनाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, नगरसेवक सुनिल पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रामदास शेवाळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्य अभियंता केशव वरखेडकर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, बाळ राजाराम महाराज यांच्या वेशभूषा धारण केलेल्या कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवत कार्यक्रमास साजेशी ऐतिहासिक वातावरण निर्मिती केली.
‘जो देश आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवूही शकत नाही’ या वचनाचा दाखला देत प्रशांत ठाकूर यांनी ऐतिहासिक वारसा सांगणार्या वास्तूंकडे दुर्लक्ष करणे उचित नाही, असे सांगत इतिहास व संस्कृतीची कास धरतच
सिडको विकास पथावरून मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी सिडकोच्या विकास प्रकल्पाचांही संक्षिप्त आढावा घेतला.
या प्रसंगी बोलताना श्रीमती मंदाताई म्हात्रे यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा बेलापूरचा किल्ला हे आपले वैभव असून त्याचे येणार्या पिढ्यांसाठी जतन करणे आवश्यक असल्याचे सांगत किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण केल्याने नवी मुंबईतील ऐतिहासिक व पर्यटन स्थळाची उणीव भरून निघेल, असे सांगितले.
नवी मुंबईला इतिहास नाही हा गैरसमज असून नवी मुंबई परिसराला विविध ऐतिहासिक कालखंडांत महत्त्व होते, असे सांगत संदीप नाईक यांनी बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.
सदर संवर्धन व सुशोभिकरण उपक्रमाचा आढावा घेताना लोकेश चंद्र यांनी बेलापूर किल्ल्याचे मूळ रूपात संवर्धन करून किल्ल्याचा परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमा अंतर्गत ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित किल्ल्याच्या इतिहासाचे सादरीकरण, थिएटर, खुला रंगमंच या सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे सांगत भविष्यात बेलापूर किल्ला हे टुरिस्ट डेस्टिनेशन ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले.