कर्जत : बातमीदार
माथेरानला ट्रॅकिंगसाठी आलेले दोन पर्यटक गुरुवारी (दि 20) गारबट पॉईंट व सोंडाई डोंगरादरम्यान दरीत अडकले होते. सह्याद्री रेस्क्यू टीमने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना दरीतून सुखरूप बाहेर काढले.
अक्षय चोपडा (वय 22) आणि पल जैन (वय 21, रा. अंधेरी मुंबई) हे दोघे गुरुवारी माथेरानमध्ये ट्रॅकिंगसाठी आले होते. ते दोघे माथेरानच्या गारबट पॉईंटच्या दिशेने गेले. पावसाचे वातावरण असल्याने झाडीतून चालताना ते भरकटत गारबट पॉईंटच्या खालच्या बाजूस असलेल्या मैदानातून चालत सोंडाई डोंगराच्या पायथ्याशी गेले. आणि गारबट पॉईंट व सोंडाईचा डोंगर याच्यामध्ये ते दोघे अडकले. दरीमध्ये धुके असल्याने आपण कुठे आलोय, हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे पल जैन हिने तिच्या वडिलांना फोन करून अडकल्याची माहिती दिली. त्यांनी ओळख काढून कर्जत येथील अग्निशमन केंद्राला ही माहिती दिली. या केंद्रातील अण्णा म्हसे यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सायंकाळी 4.30 वाजता माथेरान अग्निशमन केंद्रातील अजिंक्य सुतार यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. अजिंक्य याने त्यांच्या सह्याद्री रेस्क्यू टीमला बरोबर घेऊन गारबट पॉईंट गाठला, मात्र ते नक्की कुठे अडकले आहेत, हे माहिती नव्हते. तब्बल चार तास तपास करूनही पर्यटक सापडेना, म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबर ट्रेस करून घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. रेस्क्यू टीमचे सुनील कोळी, संदीप कोळी, उमेश मोरे, संतोष केळगणे, महेश काळे, चेतन कळंबे यांनी रात्री 8.30च्या दरम्यान त्या दोन्ही पर्यटकांना दरीतून सुखरूप बाहेर काढले. व रात्री 11.30 वाजता माथेरान पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलीस नाईक महेंद्र राठोड यांनी पर्यटकांच्या वडिलांना फोन लावून बोलावले व त्यांना त्यांच्या हवाली केले.
-जाहीर आवाहन
पावसाळ्यात धुके जास्त असते. धुक्यामुळे मार्ग भरकटण्याचे प्रकार या अगोदर घडले असल्यामुळे काहींच्या जीवावर ट्रॅकिंग बेतली आहे. त्यामुळे ट्रॅकिंग करताना स्थानिक वाटाड्याला किंवा गाईडला बरोबर घेऊनच ट्रॅकिंग करावे, असे आवाहन माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले आहे.
-मानधन द्या!
आपल्या जीवाची पर्वा न करता पर्यटक किंवा ट्रेकर्सचे जीव वाचवतात. रात्रीच्या वेळी दरीमध्ये उतरून मृतदेह बाहेर काढताना या रेस्क्यू टीमला तारेवरची कसरत करावी लागते. या सर्व रेस्क्यू टीमला प्रशासनाने मानधन सुरू करावे, अशी मागणी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे.