महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर इतकी जबरदस्त पकड बसविली आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अढळ आणि अटल निर्माण केले आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. याचे संपूर्ण श्रेय जसे देवेंद्रांच्या बुद्धिचातुर्याला द्यावे लागेल तसेच या श्रेयाचे खरे मानकरी हे गोपीनाथ मुंडे हेच आहेत.
2013पूर्वी देवेंद्र फडणवीस हे एक साधे अभ्यासू आमदार म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. विधिमंडळात जो विषय त्यांच्या वाट्याला आला असेल त्या विषयावर मुद्देसूदपणे आपले विचार किंबहुना पक्षाची भूमिका योग्य त्या पद्धतीने मांडणारा एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. 2013 साली महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला एकदम कलाटणी मिळाली. भारतीय जनता पक्षाचे घटना दुरुस्ती अधिवेशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होते.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कालावधी आणखी एकदा घटना दुरुस्ती केल्यानंतर वाढवून मिळणार होता. तशी घटना दुरुस्ती करण्यात आलीसुद्धा, पण पूर्ती कारखानाप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. अर्थात गडकरी यांच्यावरील आरोपात तसे काहीच नव्हते. गडकरी हे राजकारणाचे बळी ठरले, पण गडकरी यांनी नैतिकता जोपासली. तसं पाहता त्यांचं काहीच वाईट झालं नाही, ते उजळून निघाले, तावूनसुलाखून निघाले आणि आता त्यांनी केंद्रात आपले स्थान मजबूत केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाल जसा वाढला तसाच तो महाराष्ट्रातसुद्धा वाढविण्यात आला. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना आणखी तीन वर्षांचा कार्यकाल वाढवून मिळाला होता, परंतु ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यास हरकत घेतली आणि या पदासाठी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. पक्षाने ती शिरोधार्य मानत महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली.
राजकारण पुढे पुढे सरकत होते. भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अक्षरशः जीवाचे रान करून संपूर्ण देशात झंझावात निर्माण केला. परिणामी लोकसभेच्या 543 जागांपैकी 282 जागा पटकावून भारतीय जनता पक्षाने भारतीय राजकारणाच्या इतिहासात सर्वाधिक जागा पटकावणारा बिगर काँग्रेसी पक्ष म्हणून नाव कोरले. नरेंद्र मोदी हे 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होते. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे हे मोदी सरकारमध्ये शपथ घेणार ही सर्वांची खात्री होती, पण 20-22 मे 2014च्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांना कळले की आपले नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत नाही. तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते एकनाथराव खडसे, तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस. मुंडे यांनी खडसे आणि फडणवीस या दोघांना नवी दिल्लीत बोलावले. मुंडे, खडसे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली, पण नरेंद्र मोदी यांना सांगणार कोण? मात्र देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने मोदींच्या दरबारात कैफियत मांडण्याची संधी मिळाली. त्यांनी त्याचा आपल्या बुद्धिचातुर्याने पुरेपूर उपयोग करून घेतला.
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अशा आशयाचा संवाद झाल्याची माहिती मिळाली. देवेंद्र फडणवीस : मोदीजी, मुंडे साहब का नाम केंद्रीय मंत्रिमंडलकी सूचिमें नहीं हैं। नरेंद्र मोदी : हां, आपने सही सुना हैं। देवेंद्र फडणवीस : हमें तो अपेक्षा थी की मुंडे साहब का नाम होगा, क्योंकी वे महाराष्ट्र के एक कद्दावार नेता हैं। नरेंद्र मोदी : हां, सही बात हैं. मुंडे साहब हमारी पार्टी के बडे नेताओंमेसे एक हैं. लेकिन मैंनें जानबूझकर मुंडे साहब का नाम केंद्रीय मंत्रिमंडलमें नहीं लिया. दो दिनमें मैं भारतीय जनता पार्टी के पार्लमेंटरी बोर्ड की मीटिंग बुला रहा हूं और उस मीटींगमें मै गोपीनाथराव मुंडे जी का नाम महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टीके मुख्यमंत्री पद के उम्मीदवार करके घोषित करने जा रहा हूं. मुझे किसीभी हाल में महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टीकी सरकार लानी हैं और गोपीनाथराव मुंडे को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाना हैं। अगर मैंनें उन्हे अभी केंद्र में मंत्री बनाया तो उनका महाराष्ट्र के ओरसे ध्यान कम हो जाएगा। देवेंद्र फडणवीस : मोदीजी, आप की बात सौफीसदी सही हैं, लेकिन आप अगर मुंडेजी को अभी केंद्र में मंत्री बनाते हैं और उन्हें जो भी विभाग दिया जाएगा तो उसके जरिये हम केंद्र का जादासे जादा फंड महाराष्ट्र की ओर दे सकतें हैं उसकी बदौलत हमें भारतीय जनता पार्टी को विधानसभा चुनावमें अच्छी कामयाबी मिल सकती हैं।
देवेंद्र फडणवीस यांचा हा युक्तिवाद नरेंद्र मोदी यांना भावला, पटला आणि 26 मे 2014 रोजी नितीन गडकरी यांच्याबरोबर गोपीनाथ मुंडे हेही केंद्रात मंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकौशल्याला इथेच झळाळी मिळाली. दुर्दैवाने 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि पुन्हा महाराष्ट्राचे राजकारण बदलले. राज्यातील सारी समीकरणे बदलली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तनात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिंकून बाजी मारली. नरेंद्र मोदी यांचा जबरदस्त वरदहस्त देवेंद्र फडणवीस यांच्या मस्तकावर होता (आणि आताही आहे) आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील बिगर काँग्रेस सरकारचे कर्णधार बनले. 31 ऑक्टोबर 2014 रोजी शेषराव वानखेडे क्रीडाप्रेक्षागृहात आलिशान आणि ऐतिहासिक वातावरणात देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ज्या कौशल्याने त्यांनी कामकाज हाताळले आणि खर्या अर्थाने मोदी यांचा ’सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र अंगीकारून राज्यशकट चालविले त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात तोड नाही. त्यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत त्यांनी जी मजबूत मैत्री निभावली त्यामुळे महाराष्ट्रातल्या 48 पैकी 41 जागा महायुतीने जिंकल्या.
गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांना धोबीपछाड तर दिलाच, परंतु सामाजिक समतोल साधला तसेच विविध प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करताना आपला जबरदस्त ठसा उमटविला. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची एकजिनसी युती घडविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी जी साथ दिली आणि ती देताना उद्धवजी हे माझे मोठे भाऊ आहेत, तर नरेंद्र मोदी हे उद्धवजी यांचे मोठे भाऊ आहेत, या शब्दांत त्यांनी भावनिक नाते महाराष्ट्रात किंबहुना हिंदुस्थानात दाखवून दिले. हाच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या घोडदौडीचा ’समृद्धी महामार्ग’ ठरू शकतो. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. याबरोबर सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि मुख्यमंत्रिपदावरून माध्यमांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने चर्चा सुरू केली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जसे षण्मुखानंद सभागृहात आले आणि त्यांचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सार्या सभागृहाने जे उत्स्फूर्तपणे स्वागत केले त्यावरून उद्धव आणि देवेंद्र हे जणू जुळे भाऊच आहेत की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा.
अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जे भाषण केले ते तर शिवसेनेच्या आजवरच्या परंपरेला पुढे नेणारेच ठरावे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ’ठाकरी भाषेत’ तारीफ करून हे नाते शंभर नंबरी सोन्यासारखे असल्याचे दाखवून दिले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून भगव्या ध्वजाला प्रणाम करून माझ्या आयुष्यातील वाटचाल सुरू केली आहे आणि इथे शिवसेनेचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे मी कुठे दुसरीकडे गेलोय असे मला अजिबात वाटत नाही. मी माझ्या घरातच आलो आहे, अशीच माझी भावना आहे. मी या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, उद्धव ठाकरे यांचे प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घ्यायला आलो आहे. आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांना आनंद होईल अशा पद्धतीने येत्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळवायचे आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी जणू 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभच केला, असे म्हणावे लागेल. शिवसेनेचा इतिहास जेव्हा लिहिण्यात येईल तेव्हा त्यात शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनाचा मी एक साक्षीदार अशी त्यात नोंद होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी आणि एका अर्थाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे आणि या अधिवेशनात ’सत्ताधारी जोमात आणि विरोधक कोमात’ अशी परिस्थिती असली तरीही विरोधी पक्ष अवसान आणून सरकारवर चढाई करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
अजित पवार यांनी बालभारतीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना फडणवीस आणि बावनकुळे यांच्या नावावर कोटी करण्याचा प्रयत्न केला. त्याला सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेच्या पुस्तकाच्या पानांची झेरॉक्स आणून दादा, कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण ही वाक्ये समोर फेकली आणि याचा ज्येष्ठ नेत्यांशी काही संबंध नाही, असे सांगत पुस्तकात जे छापले आहे तेच मी वाचतोय, अशा शब्दांत जी खिल्ली उडविली त्यावरून त्यांनी आपणच या राजकारणातले चाणक्य आहोत, हेच जणू अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनी आपला जबरदस्त ठसा विधिमंडळात जसा उमटविला तसाच तो एका अर्थाने शिवसेनेतही उमटविला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जशी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती होती आणि महाजन हे जणू शिवसेना नेते असल्याप्रमाणे वागत होते त्याची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना आता युती आणखी मजबुतीने पुढे वाटचाल करीत आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट याप्रमाणे शिवसेना-भाजप युतीची पुढची गोष्ट, असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी या वेळी आवर्जून केला, तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा म्हणावा लागेल. नरेंद्र मोदी यांच्या ’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या नव्या सूत्राप्रमाणे देवेंद्र आणि उद्धव हे मोदी-शहा यांच्या मार्गदर्शनाखाली 2019ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकतील, हे सांगण्यासाठी आता कुणा ज्योतिषाची आवश्यकता आहे असे वाटत नाही.
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर