पनवेल ः प्रतिनिधी
पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दि. 21) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर-8 येथील गोकुळ डेअरीसमोरील भूखंडावर सकाळी पनवेलकरांनी सामूहिक योगासने केली. या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प आजच्या जागतिक योग दिवसानिमित्त केला.
योग ही भारतातील 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. याचे महत्त्व संपूर्ण जगालाही पटले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव जागतिक पातळीवर मांडला होता. त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून हा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात 21 जूनला एकप्रकारे उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. पनवेल परिसरातही योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना सामूहिक योगाभ्यास करता यावा, या उद्देशाने नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेऊन विशेष योग शिबिराचे आयोजन केले होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी आर. पी. यादव, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, भाजपचे युवा नेते किशोर चौतमोल, भास्कर शेट्टी, जितेंद्र तिवारी, संतोष बहन, हरीष रावल, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.