Breaking News

थोर महापुरुषांच्या वास्तू उपेक्षित का?

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सी. डी. देशमुख यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते, अशीच मागणी नरवीर मुरारबाजी देशपांडे या स्वराज्याच्या सरदाराच्या स्मारकाबाबत सातत्याने होते, तसेच स्वातंत्र्यसेनानी नाना पुरोहित यांची वास्तूदेखील काळाच्या पडद्याआड गेली आहे.  नवीन पिढीला या महापुरुषांची थोरवी समजावी यासाठी या थोर पुरुषांच्या या वास्तूंची जपणूक होणे गरजेचे आहे. यासाठी फडणवीस सरकारने पुढाकार घ्यावा, असे जनता आता म्हणू लागली आहे.

चिंतामणी द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म महाड तालुक्यातील नाते या गावातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु परिवारामध्ये 14 जानेवारी 1896 रोजी झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ गणेश देशमुख हे निष्णात वकील होते. सी. डी. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण रोह्यामध्ये झाल्यानंतर, पुढील शिक्षण मुंबईमध्ये घेतले. 1912मध्ये मुंबई विश्वविद्यालयाच्या अकरावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर संस्कृत या विषयांतील शिष्यवृत्ती त्यांनी मिळविली. 1917मध्ये त्यांनी केंब्रीज (लंडन) येथील पीयूष महाविद्यालयांमध्ये वनस्पती जीवन, रसायन, विज्ञान, भूविज्ञान या विषयांची पदवी मिळविली. सन 1918 मध्ये भारतीय सिव्हील सेवा (आयसीएस) ही उच्चतम पदवी प्राप्त केली. स्वातंत्रपूर्व काळामध्ये त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये वेगवेगळ्या उच्चत्तम पदावर काम केले. काही काळ ब्रिटिशांनी त्यांना विश्व बँकेचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. त्या नंतर आंतराष्ट्रीय मुद्रा कोष या संस्थेच्या गव्हर्नर पदावर काम केले.

भारताला 1947मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर त्यांनी आयसीएस सेवेतून निवृत्त झाले आणि भारतीय संसदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्याच वेळी त्यांची योजना आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. 1950मध्ये त्यांची भारताचे अर्थमंत्री म्हणून निवड झाली. स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये सी. डी. देशमुख यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले. त्याच वेळी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीला जोर आला होता. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण राज्यांमध्ये आंदोलने सुरू झाली. या वेळी सी. डी. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य निर्मिती आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. जरी सी. डी. देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी दिल्ली विश्वविद्यालयाचे उपकुलगुरूपद त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले होते.

देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवा बजाविणारे आणि स्वातंत्र्यानंतरही देशाची सेवा करीत असताना केवळ मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी देशाच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे पहिले महाराष्ट्रीयन मंत्री होते. त्यानंतर भारत सरकारने त्यांना 1975 मध्ये पद्मविभूषण सन्मान प्रदान केला. उर्वरित आयुष्य हैद्राबादमध्ये जगत असताना वयाच्या 86व्या वर्षी 2 ऑक्टोबर 1982 रोजी सी. डी. देशमुख यांचे तेथेच निधन झाले. अशा या थोर पुरुषाचा जन्म महाड तालुक्यातील नाते या गावामध्ये झाला. ज्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला त्या नाते येथील घराची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती, तसेच देखभाल न झाल्याने घराची कौले फुटलेली, भिंतीवर वेली पसरलेल्या, गेल्या अनेक वर्षात परिसराची साफसफाई केली नसल्याने घराची पूर्ण दुरवस्था झाली आहे. नाते गावामध्ये सी. डी. देशमुख यांच्याविषयीची माहिती आजच्या पिढीला माहीत नाही, जो इतिहास सी. डी. देशमुख यांनी घडविला त्यांच्या जन्मस्थळी नाते गावामध्ये स्मारक उभे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

हेच स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित, नरवीर मुरारबाजी देशपांडे, सुरबानाना टिपणीस यांच्या राहत्या घरांबाबत आहे. मुरारबाजी देशपांडे हे छ. शिवाजी महारांजाचे एक निष्ठावंत सेनानी होते. 16 मे 1665 रोजी मोगलांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना वीरमरण आले. त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजळोली. या ठिकाणी मुरारबाजींचा लाकडी भव्य चिरेबंदी वाडा होता, मात्र काळाच्या ओघात हा वाडा नष्ट झाला. मुरारबाजी यांच्या कतृत्वाची कहाणी सांगणारी केवळ एक संगमरवरी पाटी या ठिकाणी आहे. महाड स्वांतत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे आणि कोणत्याही रक्तपाताविना मुरूड जंजिरा संस्थान भारतात विलीन करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी नाना पुरोहित यांचीदेखील वास्तू विस्मरणात गेली आहे.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले, याच त्यांच्या महाड शहरातील वाड्यात या चळवळीच्या बैठका झाल्या होत्या, मात्र आजही वास्तू जीर्ण झाली आहे. मोडकळीस आली आहे. थोर पुरुषांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व, तसेच सहवास लाभलेल्या या वास्तूंचे जतन करणे ही आज आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे अन्यथा भावी पिढीला आपण कोणता इतिहास सांगणार आहोत आणि दाखविणार आहोत? आणि हीच अपेक्षा सरकारकडून आहे, मात्र निदान मुख्यमंत्री फडणवीस हे या बाबतीत संवेदनशील नेते असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांच्याकडूनच आपण या थोर पुरुषांच्या या वास्तूचे जतन अथवा स्मारक होण्याची अपेक्षा ठेवू शकतो. -महेश शिंदे

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply