रायगडातील जनजीवन विस्कळीत; अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस कोसळणार्या पावसाचा जोर सोमवारी (दि. 30) पाचव्या दिवशीही कायम होता. संततधारेमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोकणात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला बसला. तालुक्यातील श्रीगावमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तालुक्यातील बिडवागळे येथील शेताकडे जाणार्या मार्गावरील पुलाचा अर्धा भाग पाण्यात वाहून गेला.
जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, भोगावती, पातळगंगा, उल्हास, गाढी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
खोपोलीत रेल्वेरुळांवर झाड पडल्याने लोकल सेवा ठप्प
खोपोली : खोपोली व लौजी रेल्वेस्थानकांदरम्यान महिंद्रा स्यानियो कंपनीच्या गेटजवळ सोमवारी (दि. 30) सकाळी पावणेसातच्या सुमारास मोठे झाड रुळावर पडले. त्यामुळे सुमारे तीन तास लोकलसेवा ठप्प झाली होती. सकाळी 7 वाजता खोपोलीला येणारी लोकल कर्जतलाच थांबवण्यात आली, तर खोपोलीहून सकाळी 7.20 व 8.30 वा. सुटणार्या लोकल रद्द करण्यात आल्या. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.