उरण ः प्रतिनिधी
मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा उरण तालुक्यातील जसखार गावचा मूळ रहिवासी आहे.
फिल्मी स्टाईल जीवन जगणार्या मंगेश ठाकूरवर गेल्या महिन्यात येलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरारी होता, मात्र शांत न बसता तो अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत होता, परंतु न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, त्याच्या मागावर असणार्या येलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा कपिले आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याच्यावर पाळत ठेऊन अखेर त्याला जेरबंद केले. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश ठाकूर याचे हितसंबंध पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकार्यांसोबत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांच्या नियुक्तीनंतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाल्यानंतर मंगेश ठाकूर याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याच्यावरील अवैध हत्यारे, लैंगिक शोषण, मारामार्या, तेलाची तस्करी असे अनेक गंभीर गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. मंगेश ठाकूर चलाख असल्याने त्यांनी पोलिसांचा विश्वास संपादन करून मुंबई सागरी परीक्षेत्रातील तेल तस्करी क्षेत्रात कार्यरत असणार्या लहान-सहान तेल तस्करांना पोलिसांच्या मदतीने पकडून त्यांचे धंदे बंद पाडले व त्यानंतर आपला प्रतिस्पर्धी राजू पंडित यालाही पोलिसांच्या मदतीने अटक करून, तसेच त्याच्या विरोधात साक्षीदार बनून पोलिसांचा विश्वास संपादन करून मुंबईजवळील सागरी परीक्षेत्रात स्वतःचे तेल तस्करीचे साम्राज्य उभे केले होते, परंतु नियतीने त्याला न सोडता त्यानेच तयार केलेल्या सापळ्यात तो अडकला आणि अखेर तेल तस्करीच्या गुन्हात पोलिसांच्या हाती सापडला आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात पोलीस कोठडीत जेरबंद आहे.