नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार असून या भाषणासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे दुसरे पर्व असून या पर्वातील पहिला स्वातंत्र्य दिन अधिक खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेचे मुद्दे आपल्या भाषणातून मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुशंगानेच पंतप्रधानांनी सूचना पाठविण्याचे जाहीर आवाहन केले आहे. ’15 ऑगस्टच्या माझ्या भाषणात तुमच्या अमूल्य सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी मी आतूर आहे. माझ्या माध्यमातून तुमचे विचार देशातील 130 कोटी जनतेपुढे जाणार आहेत. ’नमो अॅप’वर या सूचनांसाठी खास ’ओपन फोरम’ तयार करण्यात आला असून तिथे तुम्ही तुमच्या सूचना नोंदवू शकणार आहात’, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.