Breaking News

कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांची बाजी

30 राज्यांतील संघ सहभागी; पाच सुवर्णांसह 12 पदकांची कमाई

मुंबई ः प्रतिनिधी

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटांमध्ये वर्चस्व मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे 62वा राष्ट्रीय कर्तव्य मेळावा 16 ते 20 जुलै या कालावधीत झाला. त्यामध्ये देशभरातील 30 राज्य पोलीस संघाचे 1250 स्पर्धक सहभागी झाले होते. व्यावसायिक आणि गुन्हे तपास शैलीचा कस पाहणार्‍या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने पाच सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्य अशी एकूण 12 पदके पटकाविली. कर्तव्य मेळाव्यात सर्वसाधारण विजेता ठरण्याचा मान महाराष्ट्र पोलीस दलाला पहिल्यांदाच मिळाला आहे, असे या संघाचे मार्गदर्शक व राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी  यांनी सांगितले. कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी पुण्यात सराव शिबिर झाले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापक अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली 40 स्पर्धक रवाना झाले होते. त्या ठिकाणी सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन (विज्ञान शास्त्राची तपासात मदत), घातपातविरोधी तपासणी स्पर्धा, संगणक, पोलीस फोटोग्राफी आदी प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये तपासात विज्ञान शास्त्राची मदत- अमोल पवार (सहाय्यक निरीक्षक, लातूर), नितीन गीते (निरीक्षक मुंबई शहर), राहुल खटावकर (सहाय्यक निरीक्षक, औरंगाबाद शहर) यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकाविले, तर फॉरेन्सिक सायन्स-नितीन गीते (मुंबई), इक्बाल शेख (हवालदार, सोलापूर ग्रामीण), राखी खवले (हवालदार, सीआयडी), अतुल जाधव (हवालदार, सातारा) हा संघ विजेता ठरला. संगणक जागृती स्पर्धेत सहाय्यक फौजदार विजय कुंभार (वायरलेस, पुणे) आणि कॉन्स्टेबल हनुमंत भोसले (सातारा) व पोलीस व्हिडीओग्राफीमध्ये समीर बेंदगुडे (नाईक, एसआरपीएफ) यांनी रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्र पोलीस संघाला महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक व प्रवीण साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply