खोपोली : प्रतिनिधी
खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रायगड राजे व मुंडे स्पोर्ट यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजेने बाजी मारली.
डीपी रोड चिंचोली येथील भव्य पटांगणावर झालेल्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी भाग घेतला होता. सामने रंगतदार झाले. अंतिम सामन्यात रायगड राजे संघाने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकांत नऊ गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंडे स्पोर्ट संघाचे सर्व गडी 156 धावांत बाद झाले. रायगड राजेने 11 धावांनी विजय प्राप्त करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. रायगड राजे या संघाचा देवांश तांडेल सामनावीर ठरला. त्याने 12 चेंडूंत 18 धावा फटकावून गोलंदाजी करताना 45 धावा देत तीन गडी बाद केले.
खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंतशेठ साबळे यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक कांबळे, सचिव संजय तावडे, कोषाध्यक्ष सचिन मसुरकर, शंकर दळवी, माजी नगरसेवक अविनाश तावडे, चंद्रप्पा अनिवार, सुहास वजरकर, नईम मुक्री यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, सर्वाधिक चौकार व षटकारासाठीचे पारितोषिक जयेश पोल याने पटकाविले. उत्कृष्ट गोलंदाज अथर्व दाखवे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रितिक पाटील, उत्कृष्ट यष्टीरक्षक रूपेश करण आदी खेळाडूंनाही गौरविण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …