भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. प्रत्येकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे, मात्र विविध डिजिटल माध्यमांचा विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने वापर करून जनतेमध्ये अफवा, गैरसमज आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधक अफवांचे पीक आणत असतील, तर त्या अफवांना सत्याच्या विचारांनी छेद देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर सक्रिय आणि बोलके राहिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
उत्तर रायगड जिल्हा भाजपची विस्तृत कार्यकारिणी बैठक गुरुवारी (दि.१०) पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. सन २०१४नंतर देशाच्या विकासाची गती अधिक वेगवान झाली असून केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य यांसह प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे देशाच्या विकासाची मजबूत पायाभरणी झाली आणि भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू आहे.
भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या विकासासाठी कार्य करणारी संघटना आहे. आमदार प्रशांत ठाकूर करीत असलेली कामे तुम्ही लोकांना दाखवत राहाल, तर भाजपची ताकद वाढण्याबरोबरच आणखी लोकं जोडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देश व राज्याच्या विकासाचा चढता आलेख राजकीय अभिनंदन ठरावातून प्रभावीपणे मांडला. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची आणि त्यातून झालेल्या परिवर्तनाची ही माहिती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नमूद केले. सरकारचे काम आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविणारा कार्यकर्ता हा भाजपचा खरा दुवा आहे. संघटन मजबूत करण्यासोबतच विकासाचा संदेश घराघरात नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजपच्या संघटनात्मक सामर्थ्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भाजपची ताकद आणि क्षमता मोठी आहे. तब्बल १४ कोटी प्राथमिक सदस्य असलेला तसेच देशात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेला पक्ष म्हणून भाजपची संघटनात्मक व्याप्ती व्यापक आहे. या भक्कम संघटनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याबरोबरच पक्षाची विचारधारा आणि भूमिका प्रभावीपणे समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. आज माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. एखादी चुकीची माहिती काही क्षणांत हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहचू शकते. त्यामुळे विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि अपप्रचाराला वेळीच उत्तर देणे गरजेचे आहे.
भाजपचा कार्यकर्ता हा केवळ पक्षाचा पदाधिकारी किंवा निवडणुकीपुरता कार्यकर्ता नसून तो समाजाशी सातत्याने संवाद साधणारा पक्षाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील नागरिकांशी संवाद वाढवावा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशाची पुढील पिढी सुदृढ आणि सक्षम घडवायची असेल, तर भारत नशामुक्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती सापडली, तर त्या संपूर्ण कुटुंबावर कोणता भयावह प्रसंग ओढवू शकतो याची कल्पनाही मन हेलावून टाकणारी आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काही मंडळी तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी लावून त्यांच्या आयुष्याला अक्षरशः मृत्यूच्या खाईकडे ढकलण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे अशा समाजकंटकांचा सुगावा घेऊन त्यांची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहचविणे आणि नशेच्या या विळख्याविरोधात सामूहिकपणे लढा उभारणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
नशामुक्त भारताच्या या व्यापक अभियानात उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाने पुढाकार घेतला असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मनापासून अभिनंदन केले. तरुणाईला व्यसनमुक्त, सक्षम आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी युवा मोर्चाने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवा मोर्चाच्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधात रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या माध्यमातून चळवळ उभी करण्यात आली असून या संकल्पाचा प्रोमो आणि युवा वॉरिअर्स टी-शर्टचे अनावरण प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सर्वाना नशामुक्त भारत संकल्पाची शपथ दिली.
प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे यांनी एसआयआरच्या संदर्भातील प्रक्रिया व त्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर यांनी सेवा संकल्प अभियान या उपक्रमाची सविस्तर माहिती देत पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा उपक्रमांचा आढावा घेतला. जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी नुकत्याच निधन झालेल्या व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकप्रस्ताव मांडला. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजकीय अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आमदार महेश बालदी यांनी अनुमोदन दिले तसेच विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख निर्णयांचे अभिनंदन करणारा ठराव जिल्हा सरचिटणीस व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी मांडला. या ठरावाला जिल्हा सरचिटणीस तथा महापौर नितीन पाटील यांनी अनुमोदन दिले. जिल्हा बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आभार मानले.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला गती मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानेही विकासाची नवी दिशा घेतली आहे, मात्र देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून सातत्याने अफवा आणि गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु भाजपची विचारधारा ही समाजहित, राष्ट्रहित आणि विकासाला प्राधान्य देणारी आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा स्वीकारल्यानंतर पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकास क्षेत्रांत देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. विकसित भारताच्या दिशेने देशाने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, प्रकल्प आणि विकासात्मक संकल्पांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे आहेत.
देशाच्या विकासाला गती देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख उपक्रमांचे अभिनंदन करणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन देताना आमदार महेश बालदी यांनी राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे आणि जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारच्या षडयंत्रांना कार्यकर्त्यांनी ठामपणे आणि प्रभावीपणे उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, प्रारंभी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाकडून देण्यात आलेले विविध कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविले जात असून संघटनात्मक कामालाही मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून सेवा, संवाद आणि संघटन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भाजपचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृहनेते व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस ॲड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, उरण उपनगराध्यक्ष रवी भोईर, खोपोली उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस सय्यद अकबर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश भगत, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, संतोष शेलार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper