माणगाव : प्रतिनिधी
रायगडमध्ये मोठमोठ्या कंपन्या येत आहेत. दिघी पोर्टमध्ये आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्याकरिता स्थानिकांच्या पाठीशी टाटा कंपनी उभी आहे. कमीत कमी कागदपत्रांमध्ये विविध बँकांच्या सहकार्याने स्थानिकांना लगेचच ट्रक, डंपर, टँकर उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी स्थानिक बेरोजगारांनी कंपनीच्या मेळाव्यात संपर्क साधावा, असे आवाहन टाटा कंपनीचे मुख्य संचालक विजय शर्मा यांनी मेंदडी येथे केले. फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटार आणि अवजड वाहतूक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदडी (ता. म्हसळा) येथील अठरा गाव आगरी समाज हॉलमध्ये टाटा ट्रक मेळावा व शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात विजय शर्मा मार्गदर्शन करीत होते. टाटा कपंनीने स्थानिक बेरोजगारांना मालक बनण्याची चांगली संधी निर्माण करून दिली आहे. धाडस करून वाहने खरेदी करा. आपल्या गाड्या पोस्को, दिघी पोर्ट या ठिकाणी लावून रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी या वेळी दिली. या शिबिरात टाटा कंपनीचे अधिकारी, तसेच कर्जाची उपलब्धता करून देणार्या बँकांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. दलजितसिंग बल, सुरेश खोसला, हरबनसिंग गरेवाल, महाराष्ट्र अवजड वाहतूक सेना अध्यक्ष इंद्रजितसिंग बल, नरेश चाळके, मुकेश बालाजी आदी मान्यवरांसह बाफना, कमल, युनेटिक मोटर्स कंपनीचे प्रतिनिधी, तसेच स्थानिक बेरोजगार व नागरिक उपस्थित होते.