Breaking News

म्हसळा पोलीस ठाणे दीड महिना वार्यावर

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा शहराचे ग्रामपंचायतीतून नगर पंचायतीत रूपांतर होत असताना शहरीकरणाच्या बरोबरीने अन्य विकास होत आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढली असताना गुन्ह्यांचा आलेखही कमी होत नाही, मात्र त्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था ठेवणार्‍या पोलिसांचा फौजफाटा वाढत नसल्याने म्हसळा शहरातील किरकोळ व अन्य गुन्हेगारीत वाढ होत आहे. यामध्ये राष्ट्रद्रोहापासून घरफोड्या असे सर्व गुन्हे आहेत. म्हसळा तालुक्यात 1972 पर्यंत औट पोस्ट होते. त्यानंतर ‘तालुका तेथे पोलीस ठाणे’ या गृहविभागाच्या धोरणानुसार म्हसळा तालुक्यासाठी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्या वेळेपासून गृहविभागाच्या आकृतीबंधानुसार म्हसळा पोलीस ठाण्याला एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, पाच सहाय्यक फौजदार, 11 हेड कॉन्स्टेबल, 13 कॉन्स्टेबल, पाच पोलीस नाईक अशी मंजूर पदे आहेत. म्हसळा तालुक्यातील 82 गावांची लोकसंख्या 59 हजार 941 आहे, यामधील 17 गावे नजीकच्या अन्य तीन पोलीस स्टेशनला जोडल्यामुळे 65 गावांतील 52342 नागरिकांची जबाबदारी म्हसळा पोलिसांवर आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. फिरती, रजा, तपास, गेम प्रॅक्टीस, कोर्स यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांची कमी जास्त प्रमाणात बाहेर आसल्याने दोन हजार नागरिकांमागे केवळ एक पोलीस तैनात असल्याची स्थिती आहे.

रायगड पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष

क्राईम रेट कमी असल्याच्या समजामुळे म्हसळा पोलीस ठाणे दुर्लक्षित आहे, मात्र 1993 मधील मुंबई साखळी बॉम्ब स्फोटात श्रीवर्धन-म्हसळा येथील पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांसह स्थानिकांचा फार मोठा सहभाग होता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच अनुषंगाने गृहविभागाने म्हसळा तालुक्यात साई, वांगणी व कोळे येथे चेकपोस्टची निर्माती केली आहे. त्याचप्रमाणे रायगड पोलीस अधीक्षकांनी म्हसळ्यासह श्रीवर्धन व दिघी सागरी पोलीस ठाण्याला आवश्यक अधिकारी, कर्मचारी देणे आवश्यक आहे. म्हसळ्यातील गुन्ह्यांचा अभ्यास करता वाहतुकीचे गुन्हे जास्त होत असतात, तर अनेक वेळा गुन्ह्यांचे रूपांतर मॉप अ‍ॅटॅक व त्याला धार्मिक जोड दिली जाते. त्यामुळे म्हसळ्याला निर्णयक्षमता असणारा अधिकारी असणे आवश्यक आहे व तशी मागणी स्थानिक जनतेची आहे. शहर व तालुक्याची लोकसंख्या वाढत आहे, व्यापारी व औद्योगिक प्रगती होत आहे, तालुक्यातून दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्ग आत आहे, त्यामुळे म्हसळा पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक व आवश्यक रिक्त पदे भरताना अन्य पदे वाढविणे आवश्यक आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून म्हसळा पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक नसल्याने गुन्हा तत्काळ नोंदविणे, ट्रॅफीक जॅम व अन्य छोट्या मोठ्या गुन्ह्यांसाठी वरिष्ठांजवळ बोलावे लागते, हे जनतेच्या व पोलिसांच्या दृष्टीने चुकीचे आहे.

-महादेव पाटील, माजी सभापती, पंचायत समिती म्हसळा

म्हसळा पोलीस ठाण्यामध्ये निरीक्षक, उपनिरीक्षकाची पदे रिक्त असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे, पदे भरली जातील.

-बापूसाहेब पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply