
उरण ः वार्ताहर
युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे शनिवार दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ’रोजच्या जगण्यातील संविधान’ या विषयावर व्याख्यान व संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी व्याख्यान देत असतानाच तरुणासोबत संवाद ही साधला. तारा येथील युसुफ मेहर आली सेंटर मधील कौशल्यघर सभागृहात तारा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष वारे म्हणाले की, भारतीय संविधान हे फक्त सुप्रिम कोर्ट, वकील किंवा बुद्धिजिवींच्याच कामाची गोष्ट नाही. महिला, पुरुष विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, यांच्या प्रत्येकाच्या जिवनाशी संविधानाची नाळ जोडली गेली आहे. या वेळी त्यांनी उपस्थित युवक व युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले.
लोकं आपल्या अधिकारांबद्दल जितके जागृत असतील तितकेच त्यांना त्यांचे अधिकारही मिळतील. याचे जिवंत उदाहरण म्हणजे संविधानाने दिलेल्या अधिकाराने रायगडमधील जनतेने संघटीत होऊनच महामुंबई सेज प्रकल्प परतवून लावला. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न संविधानाने पूर्ण होऊ शकतं.
-सुभाष वारे, प्राध्यापक