Breaking News

कळंबोलीकरांचे भवितव्य एक फेजवर

विजेच्या कमी-जास्त दाबाने विद्युत उपकरणे जळाली; नागरिकांचे नुकसान

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

महावितरणच्या कळंबोली विभागाला विजेचे साहित्य पुरविण्यात येत नसल्याने कळंबोलीच्या काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. तीन फेजचे काम एकच फेज करत असल्याने सतत विजेचा लपंडाव आणि विजेच्या कमी-जास्त दाबाने विजेची उपकरणे जळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे, तर महावितरण कर्मचार्‍यांना जीव धोक्यात घालून ऱात्री अपरात्री भरपावसात सतत होणारी खंडित वीज पूर्ववत करण्याचे काम करावे लागत आहे. कळंबोली महावितरण अधिकार्‍यांच्या दिशाहीन कारभारामुळे कळंबोली महावितरण विभागाला केबल व अन्य साहित्य मिळत नसल्याने येथे काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. कळंबोली वसाहत निर्माण झाल्यापासून कळंबोली सेक्टर 4-ई जनता मार्केट विभागाला तीन फेजने विद्युत पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे विजेचा लपंडाव व घरातील उपकरणे जळून जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, पण गेल्या आठवड्यापासून या विभागातील दोन फेज जळाले असून या विभागातील 40 इमारती व 35 दुकाने ही एका फेजवर प्रकाशित करण्यात आली आहेत. सततच्या विजेच्या या लपंडावाने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होत असून त्यांचे धंदे डबघाईला आले आहेत. त्यांची पाचावर धारणा बसली असून ते काकुळतीला आले आहेत. तर एकाच फेजवर एवढा मोठा विभाग असल्याने वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे एमईसीबी कर्मचारी जीव धोक्यात घालून ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सेवेत कोणतीही कसूर करीत नाहीत, तर दुसरीकडे अधिकारी निवांत आहेत, असा ग्राहकांचा आरोप आहे. आठ तासांची ड्युटी, त्यानंतर दोन-तीन वषात बदली याच मानसिकतेत अधिकारी काम करताना दिसत असल्याने कळंबोलीकरांचे एक फेजवरच भवितव्य आहे, असे काही ग्राहकांनी सांगितले.

घरातील विजेची उपकरणे जळाली

तीन फेजचा वीजपुरवठा एकाच  फेजने होत असल्याने विजेचा लपंडाव सतत चालू आहे, तर कमी जास्त दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे व बल्ब जळून जात असल्याने  रहिवाशांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply