ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आणि त्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य महाशिबिर असे समीकरण आता पनवेलवासीयांसाठी बनले आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त, पण ज्यांना पैशाअभावी आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावेत, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड मेडिकल असोसिएशन दरवर्षी महाआरोग्य शिबिर घेत आहे, या महाशिबिराची तपपूर्ती यंदा झाली.
समाजसेवेचा दिखावा करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे उपक्रम सुरू करतात. आरोग्य शिबिर घेतले जाते, पण हे उपक्रम किती वर्षे चालतात हा संशोधनाचा विषय आहे. एखाद वर्ष आरोग्य शिबिर घेतले जाते, पुढच्या वर्षी ते बंद पडते. हा अनेक ठिकाणचा अनुभव, पण सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल भाजप आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आरोग्य महाशिबिर घेतले जाते. सलग 12 वर्षे हे शिबिर घेतले जात आहे. दरवर्षी होणार्या या शिबिराचे अत्यंत नेटके नियोजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. हे महाशिबिर यशस्वी होते कारण त्यामागची रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकार्यांची भावना महत्त्वाची आहे. यंदाच्या शिबिरासाठी 24 कमिट्या तयार करण्यात आल्या. शिबिराच्या नियोजनासाठी पाच बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीला रामशेठ ठाकूर उपस्थित होते व प्रत्येक गोष्टीवर ते बारकाईने लक्ष देऊन होते, हे विशेष. महाशिबिरात दरवर्षी आठ ते 10 हजार नागरिकांची तपासणी करण्यात येते. याचाच अर्थ गेल्या 12 वर्षात एक लाखांहून अधिक जणांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचली आहे. महाशिबिराच्या यशस्वितेमागे अनेकांचे हात आहेत. चारशे ते साडेचारशे डॉक्टर यात सहभागी होतात. आपुलकीने तपासणी व उपचार करतात. सीकेटी कॉलेजमधील तरुण पिढी यात सहभागी होते. स्वयंसेवक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी काम करताना वयोवृद्धांना हात धरून शिबिर ठिकाणी आणत होते, त्यांची काळजी घेत होते, विचारपूस करीत होते. तरुण पिढीला संस्कार देण्याचे कामही या महाशिबिरातून घडत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आरोग्य महाशिबिरातून गेल्या 12 वर्षात एक प्रकारचा विश्वास नागरिकांना मिळाला आहे. अत्यंत विश्वासाने प्रत्येक जण शिबिराला येतात. रविवारी मुसळधार पाऊस असूनही हजारो नागरिक तपासणीसाठी येत होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुसळधार पावसातही हे आरोग्य महाशिबिर यशस्वी झाले ते संघटित मेहनतीमुळे. आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. विखे-पाटील यांना राजकीय, सामाजिक वारसा आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम मोठे आहे. शिक्षण, सहकार, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान व अभ्यास आहे, त्यांचे मेडिकल कॉलेज आहे, तेही अनेक वर्षे मोठे आरोग्य शिबिर घेतात. त्यामुळे उद्घाटनाला योग्य पाहुणा लाभला व सर्वच अंगाने हे शिबिर यशस्वी झाले. तपपूर्ती करताना या आरोग्य महाशिबिराने एक विश्वासाचे नाते समाजात निर्माण केले हे मात्र निश्चित.