Sunday , June 4 2023
Breaking News

बंगळुरूचा कर्णधार विराटच्या राजीनाम्याची मागणी

बेंगळुरू : वृत्तसंस्था

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ या सीझनमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकला नसून, कर्णधार विराट कोहलीवर यामुळे सर्वच बाजूंनी टीकेची झोड उठते आहे. अशातच विराट कोहलीने बंगळुरूच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोशल मीडियावर अनेक चाहते करत आहेत.

गेल्या 12 सीझन्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकदाही आयपीएल जिंकू शकलेला नाही. या टीमने तीनदा आयपीएलचे उपविजेतेपद पटकावलं आहे. अशातच या वेळी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासूनच रॉयल चॅलेंजर्स अत्यंत खराब प्रदर्शन करत आहेत. विराट कोहली, एबी डी व्हीलिर्स, शिमरॉन हेटमेयर, मोईन अली आणि युजवेंद्र चहलसारखे दिग्गज खेळाडू असूनही हा संघ एकही सामना आतापर्यंत जिंकू शकलेला नाही. यामुळेच बंगळुरूचे चाहते संतप्त झाले आहेत. आपल्याला रॉयल चॅलेंजर्सचा चाहता म्हणून घेण्याचीही लाज वाटत असल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली आहे.

विराट कोहलीला संघातून काढून टाकावे, त्याजागी नवीन कर्णधार नेमावा, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. 80 कोटी रुपये खर्च करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम विकत घेण्यात आली होती, पण आता सगळ्या खेळाडूंची बदली करायला हवी, अशीही मागणी करण्यात येते आहे.

महेंद्रसिंह धोनी जेव्हा नसतो तेव्हा विराट कोहली एक अत्यंत सामान्य कर्णधारच असतो, अशीही चर्चा सध्या क्रिकेटच्या वर्तुळात सुरू आहे. धोनी संघात नसतो किंवा त्याचे मार्गदर्शन नसते तेव्हा विराटला सामने जिंकता येत नाहीत, असं बोललं जातं आहे. तेव्हा येत्या दिवसांत विराट त्याच्याबद्दलचे हे मत बदलतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यंदा तरी आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करतं का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply