Breaking News

आरोग्य महाशिबिर यशस्वी

मुसळधार पावसातही हजारोंची गर्दी

पनवेल ः प्रतिनिधी

सिडको अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिकेटी महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराला रविवारी (दि. 4) जोरदार पावसाने हजेरी लावून शिबिर यशस्वी केले. या महाआरोग्य शिबिराचा आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. यावेळी सगळ्याने आयोजकांनी केलेल्या नियोजना व सुविधांचे कौतुक केले

सिकेटी महाविद्यालयात रविवारी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवासानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य महाशिबिर आयोजित  करण्यात आले होते. शनिवारी  रात्रीपासून पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ते बंद झाले होते. काहींच्या घरात पाणी शिरले असल्याने आजच्या शिबिराला गर्दी होईल की नाही याबाबत शंका होती. पण सकाळी 8 वाजल्यापासूनच लोकांनी गर्दी सुरु झाली. दुपारी 2वाजेपर्यंत वेळ असताना त्यानंतरही लोक तपासणीसाठी येत होते. डोळे तपासणीसाठी मोठी गर्दी होती. दोन मजल्यांवर फक्त डोळे तपासणीसाठी सोय आणि ताबडतोब चष्मे दिले जात होते.

 याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी जनरल तपासणी,आयुर्वेदिक, होमियोपॅथिक आणि हाडांच्या रोगांची तपासणी सिकेटी महाविद्यालयात तर दंतरोग तपासणी, मधुमेह, नाक, कान, घसा, बालरोग, त्वचा आणि हृदयरोग तपासणी सिकेटी लॉ कॉलेजमध्ये करण्यात येत होती.  नोंदणी झाल्यावर स्वयंसेवक तुमची तपासणी कोठे होणार, त्या रूममध्ये घेऊन जात होते. रुग्ण आणि सोबत आलेल्यांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.      

मोठा पाऊस असूनही शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी जे. जे. हॉस्पिटलमधून 45 डॉक्टर आले होते याशिवाय नवी मुंबईतील आणि पनवेलच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर मोठ्या प्रमाणात आल्याने रुग्णांना तपासणीसाठी जास्त वेळ लागला नाही. या शिबिरात एकूण  8500 रुग्णाची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉक्टर अरूणकुमार भगत यांनी दिली.

आम्ही सकाळी 8वाजता घरून निघालो पावसामुळे गाडी उशिरा आली. त्यामुळे याला थोडा उशीर झाला पण आल्यावर कोणतीही अडचण आली नाही. नोंदणी झाल्यावर स्वयंसेवक आम्हाला या तपासणी रूमपर्यंत घेऊन आले. त्यामुळे शोधाशोध करावी लागली नाही. डॉक्टरांनी तपासणी करून औषधे दिली.

-नामू पाटील , केळवणे

आरोग्य शिबिरात रुग्णांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आल्यापासून आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. प्रत्येक ठिकाणी मदतीला स्वयंसेवक धाऊन येत होते. त्यामुळे आम्ही तपासणीसाठी घेऊन आलेल्या रुग्णांचे समाधान झाले. गरिबांचे कैवारी असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभो.

-सीमा खडसे

या आरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची चांगली सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पावसात लांबून आलेल्या रुग्णांची सोय झाली. जेवण ही चांगले होते.

-रत्ना पाटील

टिपलेले क्षण

आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. मुसळधार पाऊस असतानाही सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी व तपासणीसाठी मोठी गर्दी होती.

शिबिरासाठी येणार्‍यांचे स्वतः आमदार प्रशांत ठाकूर स्मितहास्य करीत स्वागत करीत होते, शुभेच्छा स्वीकारीत होते.

उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे गीत स्क्रीनवर दाखविले जात होते, त्यामुळे सभागृह  भारावले होते.

महाशिबिराचे थेट प्रक्षेपण मल्हार टीव्हीच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह केले जात होते.

मान्यवरांचे स्वागत झाले तेव्हा तुतार्‍यांनी सारे सभागृह दणाणून गेले.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण मोहकर यांनी केले.

या समारंभात ’आय देवेंद्र-मी देवेंद्र’ या टीशर्टचे लॉचिंग करण्यात आले.

ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

पनवेल महानगर पालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य प्रविण पाटील यांचा यावेळी विखे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुसळधार पावसातही आठ हजार नागरिक शिबिरात सहभागी झाले, याचा अर्थ गेल्या बारा वर्षापासून या शिबिरामुळे लोकांमध्ये आरोग्यविषयी जागृती झाली आहे. .

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply