चिरनेर, उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर गावाला दरवर्षी पुराचा तडाखा देणार्या मध्यवर्ती नाल्याचे खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्याच्या विकासकामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून एमएमआरडीएकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, उद्योजक पी. पी. खारपाटील, राजाशेठ खारपाटील, सरपंच संतोष चिर्लेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐतिहासिक चिरनेर गावाच्या मध्यात डोंगरातील पाणी वाहून नेणारा मुख्य नाला आहे. पावसाळी दिवसांत डोंगर परिसरात पडणार्या पावसाचे पाणी या नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येत असल्याने चिरनेर गावात पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या परिस्थितीतून चिरनेरच्या जनतेला बाहेर काढण्यासाठी भाजप नेते
महेश बालदी यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य नाल्याचे खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यामुळे पुढील वर्षापासून चिरनेरवासीयांना पूरसंकटातून मुक्ती मिळणार आहे.