![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/crime-2-2.jpg)
रोहे ः प्रतिनिधी
कोेरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने वापरात येत असलेल्या दोन फॉगिंग मशिन डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहातून चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्यर्य म्हणजे दुसर्या दिवशी या फॉगिंग मशिन सापडल्या आहेत. आता मशिन कोणी चोरली होती याचा पोलीस शोध घेत आहेत. रोहा-कोलाड मार्गावरील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाच्या तळमजल्याच्या जिन्याखालून 60 हजारांच्या दोन फॉगिंग मशिनची मंगळवारी दुपारच्या सुमारास चोरी झाल्याने रोह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. डी. मारकंडे करीत आहेत. दरम्यान, रोहा अष्टमी नगर परिषदेच्या मालकीच्या फॉगिंग मशिन चोरीला गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडल्यानंतर बुधवारी पहाटे मशिन सापडल्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण आणि स्वच्छता व आरोग्य सभापती अहमद दर्जी यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे व्यावसायिक हतबल
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/Corona-Logo-f-4.jpg)
पेण ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे दोन महिने व्यवसाय बंद असल्यामुळे कापड, सराफ, हॉटेल, सलून आदी अनेक व्यावसायिक हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वाढती स्पर्धा तसेच व्यवसायातील गुंतागुंतीमुळे व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लग्नसराईच्या सीझनमध्ये कोरोनारूपी संकट उभे राहिल्यामुळे कमाईचा पूर्ण हंगाम घरी बसून गेल्यामुळे व्यावसायिकांमधील अस्वस्थता वाढली आहे. पेणच्या बाजारपेठेत कापड व सराफ व्यावसायिकांची संख्या मोठी असून कापड आणि सराफ व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून दैनंदिन खर्च भागवणे तरी शक्य होईल, अशी मागणी येथील व्यावसायिक करताना दिसत आहेत.