पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत इ. 6वी व 7वीच्या स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे विक्री व प्रदर्शन ’खरी कमाई’ या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरूणशेठ भगत यांच्या हस्ते राखी निर्मिती व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात झाले. उद्घाटनप्रसंगी अरुणशेठ भगत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतः निर्मिती केलेल्या राख्या आणि त्यांचे परिश्रम पाहिल्यानंतर भविष्यात यातूनच लघुउद्योजक तयार होतील, डी. आर. वर्तक व यु. जी. गोंधळी या शिक्षिकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, गव्हाणचे ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, प्रयोगशाळा प्रमुख रविंद्र भोईर, गुरुकुलप्रमुख संदिप भोईर, पी. आर. काकडे, कनिष्ठ लेखनिक चंद्रकांत मढवी तसेच सर्व अध्यापक, सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले तर डी. आर. वर्तक यांनी आभार प्रदर्शन केले.