महाड : प्रतिनिधी
येथील शिवसेना नेते आणि माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे शनिवारी (दि. 14) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी ग्रामीण विकासाला चालना दिली. अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. अशा या महाडच्या विकासपुरुषाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात शनिवारी सकाळी 10.30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अमित मोरे, मुली, जावई, नातंवडे असा मोठा परिवार आहे.
प्रभाकर मोरे यांच्या अकस्मित जाण्याने महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मार्गदर्शक नेता हरपला, अशी प्रतिक्रिया महाडचे आमदार भारत गोगावले यांनी व्यक्त केली, तर एक उत्तम प्रशासक, अभ्यासू नेता महाडने गमावला. मी माझ्या कार्यकाळात वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घ्यायचो, अशा शब्दांत माजी आमदार माणिक जगताप यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.