पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांतर्फे शैक्षणिक मदत देण्याचा कार्यक्रम झाला. विद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण मढवी याच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या विद्यालयात आपण शिकलो आणि चांगले संस्कार मिळाले त्या विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करण्याच्या हेतूने किरण मढवी या तरुणांने हे समाजकार्य हाती घेतले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च म्हणून आर्थिक मदत देण्यात आली. माता-पालक मेळाव्याच्या निमित्ताने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अनोखी भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उलवे ग्रामपंचायत सरपंच कविता राजेश खारकर आणि स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील ठाकूर, शिक्षक पालक संघाच्या सदस्या सुधा पाटील आणि शीतल सोमासे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि या विद्यार्थ्याचे कौतुक केले आणि धन्यवाद दिले. स्वागत आणि सूत्रसंचालन व्ही. जी. पाटील यांनी केले. अमोल गायकवाड,आदित्य खंदारे, ऋतुजा साळुंखे आदी विद्यार्थ्यांनी किरण मढवी या माजी विद्यार्थ्याचे आपल्या मनोगतातून ऋण व्यक्त केले. एस. डी. पाटील आणि व्ही. व्ही. गावंड यांनी माता-पालक मेळाव्याच्या निमित्ताने माता पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष शरद खारकर यांनी आपल्या मनोगतातून किरण मढवी यांना धन्यवाद दिले आणि विद्यार्थी आणि माता-पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी व्ही. जी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस. आर. गावंड आणि बी. आर. चौधरी यांनी सहकार्य केले.