पनवेल ः रामप्रहर वृत्त
दुर्मिळ वनौषधी बियांचे वाटप, वृक्ष लागवड, वृक्षवाटप, वनौषधी परिचय शिबिर आदी भरगच्च कार्यक्रमानी साप्ताहिक आर्या प्रहरचा सहावा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी आर्या वनौषधी संस्थेचे सुबोध म्हात्रे, जनार्दन मोकल, पत्रकार ऋषीकेश थळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काडे चिराईत, सर्पगंधा, विजयासार, अर्जुन, लालचित्रक, पांढरा चित्रक, मेढशिंगी, मालकांगोणी, सीतेचा अशोक, अग्निशिखा, वज्रदंती आदी दुर्मिळ वनौषधी बियांचे वाटप करण्यात आले. अल्पावधीतच वनौषधीप्रेमींच्या हृदयात स्थान मिळवणार्या आर्या प्रहरच्या वर्धापनदिनी नवीन पनवेल येथे वनौषधी परिचय शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील यांनी सारिवा, पुनर्नवा, अर्जुन, कांचनार, पेव, अर्क, वासा, मुरुडशेंग, धात्री, अगस्त, अपामार्ग, पाताळगारुडी, दगडीपाला, अमृता, काकजंघी, दमवेल, मधुपर्णी, मल्टीव्हिटामिन, गुडमार आदी 60 प्रकारच्या वनौषधींची ओळख व औषधी गुणधर्मांची माहिती दिली. संध्याकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते केवडा, काडे चिराईत, दमवेल, गुडमार, चित्रक आदी वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.