जत (सांगली) : प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकर्या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनात आघाडीवर होता, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून, हे राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (दि. 10) केले. सांगलीच्या जतमध्ये आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मला विचारायचे आहे की त्यांनी 10 वर्षांत राज्यासाठी काय केले? शरद पवारांनी 15 वर्षांत महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय केले? तुमच्या 55 वर्षांच्या कामांपेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामे अधिक आहेत, असा दावा या वेळी शहा यांनी केला. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने सांगलीसाठी काय केले हे सांगताना शहा म्हणाले, सांगलीच्या प्रत्येक शेतकर्याच्या बँक खात्यात मोदींनी सहा हजार रुपये थेट जमा करीत त्यांची मदत केली. जनावरांच्या लसीकरणासाठी 13 हजार 500 कोटी रुपयांचा निधी देत दुग्ध उत्पादन वाढवण्याचे काम फडणवीस सरकारने केले. इस्मारपूरमध्ये टेक्सटाईल पार्क बनवले. कोल्हापूर-पुणेदरम्यान डबल ट्रॅक रेल्वे सुरू केली. सांगलीतील 11 लाख शेतकर्यांचे तीन हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. एक लाख घरांमध्ये शौचालये निर्माण केली. त्याचबरोबर फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी पाणीवाटपाबाबत बोलणी केली. त्यानंतर येडीयुरप्पा सरकारने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले. शहा पुढे म्हणाले, मनमोहन सिंग सरकारने राज्याला 1,15,500 कोटी रुपये दिले, तर मोदींनी 2,46,354 कोटी रुपयांची दुपटीहून अधिक मदत राज्याला दिली. मौनीबाबा मनमोहन यांचे सरकार असताना देशाच्या जवानांना अपमानित केले जात होते. त्यांचे शीर कापून नेले जात होते. या वेळीही तसेच होईल असे जनतेला वाटत होते, मात्र आता मौनीबाबा नव्हे; तर 56 इंच छाती असणारे पंतप्रधान मोदी होते. त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केले.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले, पण तुम्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. फडणवीस वयाने लहान असतील, पण त्यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही जो दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे. रात्रीच्या 1 वाजतादेखील कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते मदतीसाठी तत्पर असतात, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.