Breaking News

लग्नाची खात्री नसताना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

सहमतीने ठेवल्या जाणार्‍या शरीरसंबंधासंदर्भात

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्न होणार नसल्याची खात्री महिलेला असतानाही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही. लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केला, असेही म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकार्‍याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहाय्यक आयुक्त महिलेने केला होता. तक्रारदार महिला सीआरपीएफमध्ये असलेल्या या अधिकार्‍याला 1998पासून ओळखत होती. त्याने 2008मध्ये लग्नाचे आश्वासन देत बळजबरीने संबंध प्रस्थापित केले, असा आरोप या महिलेने केला आहे. 2016पर्यंत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळातही दोघे एकमेकांच्या घरी थांबायचे. दरम्यान, अधिकार्‍याने जातीचा अडसर येत असल्याचे कारण देऊन लग्नास नकार दिला. त्यानंतरही 2016पर्यंत दोघांमध्ये शारीरिक संबंध होते, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत निकाल दिला. न्यायालय म्हणाले की, दोघांत आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांत एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध होते. वेगवेगळ्या कारणांमुळे ते एकमेकांच्या घरी जात होते. त्यातून दोघेही एकमताने संबंध ठेवत होते असेच दिसून येते. 2008मध्ये दिलेले लग्नाचे वचन 2016मध्ये पूर्ण करू शकला नाही. या एका आधारावर लग्नाचे आश्वासन केवळ शारीरिक संबंधांसाठी दिले होते असे म्हणता येत नाही. लग्नात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात हे महिलेला माहीत होते. त्यामुळे या शरीरसंबंधांना बलात्कार म्हणू शकत नाही, असा निकाल देत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply