नागपूर : प्रतिनिधी
गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे, तर 382 वाघांना जिवंत पकडण्यात आले. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. 2000 ते 2018 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक 2,967 वाघ आहेत. जगातील वाघांची संख्या 3,951 असून त्या तुलनेत भारतात 75.09 टक्के वाघ आहेत, मात्र गेल्या 19 वर्षांत भारतात 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीची 463 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो. थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या 49 घटनांमध्ये 369 वाघांची शिकार करण्यात आली आहे. जप्तीच्या घटनांमध्ये एकूण 1142 वाघांचा मृत्यू झाला आहे.