Breaking News

कळंबोलीतील पायाभूत सुविधांची दुरुस्ती

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे कळंबोली वसाहतीत पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत सिडकोकडून इतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्ते, उद्यान, पदपथ आणि इतर सुविधांचा समावेश आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी लक्ष टाकले आणि कामांचे प्रस्ताव तयार झाले. त्याला मान्यता मिळून काही कामांना सुरुवात सुद्धा झाली. सिडको वसाहतीच्या हस्तांतरणाच्या हालचाली सुरू आहेत, मात्र नोडल एजन्सी असलेल्या सिडकोने सर्व पायाभूत सुविधा विकसित, तसेच सुस्थितीत करून दिल्याशिवाय कळंबोली नोड तरी वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजप नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, अमर पाटील, तसेच शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, प्रशांत रणवरे यांनी केली होती. याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता. त्याची दखल सिडकोने घेतली आहे. त्याचबरोबर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उर्वरित आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ते पूर्ण करून देण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. त्यानुसार अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे आणि कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी आराखडा तयार करून तो प्रशासकीय मंजुरीकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर एजन्सी नियुक्त करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

ही कामे होणार

उघडी असलेली पावसाळी गटारे झाकली जाणार. कळंबोलीतील उद्यानांची दुरुस्ती करून त्याचे सुशोभीकरण, रस्ते खड्डेमुक्त करून देणार, त्याचबरोबर कळंबोलीकरांच्या चालण्याकरिता पदपथांची दुरुस्ती करून दिली जाणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply