पनवेल पोलिसांची कामगिरी; 60 गाड्या सुपूर्द
पनवेल : वार्ताहर
गाडी व्यवसायाला लावतो असे सांगून वाहनमालकांची काही जणांनी फसवणूक केली होती. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक बनवून फसवणूक करणार्या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून तीन कोटी सात लाख 80 हजार रुपये किमतीच्या एकूण 68 वेगवेगळ्या चारचाकी मोटारी हस्तगत करण्यात आल्या. या मालकांना चावी देताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद बघून आज खर्या अर्थाने गणेशोत्सव साजरा केल्याचे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी केले. ते शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे बुधवारी (दि. 4) आयोजित चावीवाटप कार्यक्रमात बोलत होते. या वेळी दुधे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुनील तारमळे, विश्वासराव बाबर, इशान खरोटे, घुगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकाच्या उपस्थितीत 60 मोटार वाहनांचे मालकांना हस्तांतरण करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तारमळे, बाबर, खरोटे, घुगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हवालदार रवींद्र राऊत, विजय अहिरे, रवींद्र कोळी, दिलीप चौधरी, बाबाजी थोरात, पोलीस नाईक अजय वाघ, अजय कदम, यादवराव घुले, संदीप नवले, राजेश मोरे, अमरदीप वाघमारे, दिनेश जोशी, अशपाक शेख, पंकज पवार, संजय फुलकर, पोलीस शिपाई राहुल साळुंखे, सुनील गर्दनमारे, राजू खेडकर आदींनी मेहनत करून या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून 68 चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत. ही कामगिरी करणार्या पथकाचा या वेळी सत्कार करण्यात आला. फिर्यादी व साक्षीदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.